Karad News | दारू महागली... पण कराडकरांची झिंग कायम
अशोक मोहने
कराड : राज्य सरकारने दारूवरील उत्पादन शुल्क वाढविल्याने जुलैपासून दारूच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तरीही महिनाभरात दारू विक्रीवर या दरवाढीचा काडीचाही परिणाम झाल्याचे दिसत नाही. कराड शहर परिसरातील दारू विक्रीची उलाढाल पाहता दारू महागली असली, तरी मद्यपींवर दारूची झिंग मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे.
कराड शहर परिसरात 200 बार, देशी दारू विक्रीची दुकाने 25, वाईन शॉप 11 आहेत. तर अवैध दारू विक्रेते हजारहून अधिक असतील. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दारू विक्रीत फारसा फरक झालेला नाही; पण विदेशी पिणारे काही प्रमाणात देशी दारूकडे वळले आहेत. राज्य सरकारने उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे वाईन, स्कॉच आणि बीअर या सर्व प्रकारच्या दारूच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे मद्यपींना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. परमिट रूममधील दारूच्या विक्रीवरील व्हॅट 5 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे बारमधील दारूही महागली आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील दारू विक्रीवर 10 ते 15 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात आले आहे. त्यामुळे बारमध्ये बसून दारू पिणेही महागले आहे. असे असले तरी मद्यपींची संख्या आणि विक्रीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे एका वाईन शॉपमालकाने सांगितले.
पूर्वी 60 ते 70 रूपयांना 180 मिली मिळणारी देशी दारूची बाटली आता 80 ते 120 रूपयांना मिळत आहे. विदेशी दारू 130 रूपयांवरून 205 रूपयांवर गेली आहे. स्कॉच 750 मिली 1 हजार 500 रूपयांना तर काही ब्रॅन्ड 2200 ते 2500 रूपयांना मिळत आहेत. महिलांची पसंती असणार्या वोडकाच्या किंमतीही वाढल्या असल्या तरी त्याची विक्रीही सुरूच आहे. बिअर 160 रूपयांवरून 220 रूपयांना विकली जात आहे. दर वाढल्यापासून बारमध्ये बसून दारू पिणारांची संख्या काही प्रमाणात घटली असल्याने सांगण्यात आले. बारमध्ये प्यायला न जाता वाईन शॉप मधून खरेदी करून इतरत्र अडोशाला, शिवारात, वस्तीवर, रस्त्याकडेला मद्यपिंच्या बैठका झडू लागल्या आहेत.
बारमध्ये जाऊ की नको...
दारूचे दर वाढल्याने तळीरामांना बारमध्ये जाऊ की नको, असा प्रश्न पडला आहे. बारमालक 25 टक्के मार्जिन घेतात. 160 रुपयांची क्वॉर्टर 200 रुपयांना झाली. यावर बारमालकांचे मार्जिन 25 टक्के. त्यामुळे बारमध्ये बसून दारू पिण्यापेक्षा बाहेर, मित्राच्या घरी, आडोशाला बैठका बसू लागल्या आहेत. परिणामी, बारमध्ये बसून दारू पिणार्यांची संख्या घटली असल्याचे कराड शहरातील एका बारमालकाने सांगितले.

