

चाफळ : पाटण व चाफळ खोर्यात वाघ, बिबट्यांच्या संख्येत होणारी वाढ पाहता शासकीय गोटात समाधान व्यक्त होत आहे. पण शेतकरी राजा मात्र काळजीत पडला आहे. याचे कारण म्हणजे रोजच्या भुकेला वन्य प्राण्यांपासून होणारी शेळ्या व कुत्र्यांची शिकार होत. अगदी एका आठवड्यात सरासरी चार-सहा जनावरांची शिकार होतंच असते. अनेकदा रात्री अपरात्री दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळी पळवल्याचे सकाळीच समजते. तसेच कधीकधी राखणीसाठीचा कुत्राही फस्त झालेला असतो. शेळी ही गरीबाची गाय आणि झटपट दामदुप्पट उत्पन्न देणारी बँक आहे. तिच्याकडून मिळणार्या उत्पन्नातून संसाराला हातभार लागत असतो. अशातच वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना वारंवार घडत असतात. शेतकर्यांच्याही जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे महिला वर्गच नव्हे तर पुरूष मंडळीही धास्तावले आहेत.
एकमेकांच्या सोबतीने चराऊ रानातून जनावरे चारली जातात. यापुर्वी चाफळसह विभागातील शिंगणवाडी (चाफळ) येथे गोठ्यात घुसून एका रात्रीत तीन शेळ्यांचा बिबट्याने जीव घेतला. बाहेर पडता आले नसल्याने रात्रभर तो आतच होता. सकाळी गोठा मालकाने दार उघडून आत जाताच समोरच बिबट्या दिसला. दैव बलवत्तर असल्याने बिबट्याने धूम ठोकली. चाफळ परिसरात एकाच ठिकाणी तीस चाळीस कोंबड्यांचा जीव घेतला तसेच कृष्णत साळुंखे यांच्या तीन शेळयांचा एकाचवेळी जीव घेतला. धायटीत महिलेच्या समक्ष शेळीवर हल्ला झाल्याने महिला घाबरल्या. माजगाव येथील कोंबड्यांच्या शेडमधील 150 कोंबड्यावर बिबट्याने डल्ला मारला अशा कित्येक घटना नव्याने घडत आहेत.