

खंडाळा : खंडाळा तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी याच भागात बिबट्या आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने तात्काळ दखल घेतली होती. मात्र, आता पुन्हा बिबट्या परिसरात सक्रिय असल्याची नवी चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिट ते कान्हवडी दरम्यान असणार्या नैसर्गिक खिंडीत एका बिबट्याचे दर्शन झाले होते. या बिबट्याचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या घटनेमुळे तालुक्यात, विशेषत: पश्चिम भागात, बिबट्याचा कायमस्वरूपी वावर सुरू झाला आहे की काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही दिवस शांतता होती, परंतु आता पुन्हा काही ग्रामस्थांनी परिसरात बिबट्याला पाहिल्याचे आणि त्याच्या पाऊलखुणा आढळल्याचे दावे केले आहेत. आसपासच्या डोंगराळ व शेत-शिवारात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे.या परिसरातील शेतकरी आणि गुराखी यांना आपल्या शेतीत काम करताना किंवा गुरे चारताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे.
बिबट्याच्या भीतीने काही शेतकरी रात्रीच्या वेळी शेतावर जाणे टाळत आहेत. या भागात बिबट्याचा कायमस्वरूपी अधिवास झाला असल्यास, वन विभागाने या वन्यजीवाच्या सुरक्षिततेसाठी आणि मानवी वस्तीमध्ये येणे टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. वन विभागाकडून उपाययोजनांची अपेक्षा स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, वन विभागाने या चर्चेची पुन्हा एकदा गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.