

ढेबेवाडी : आगाशिवनगर (मलकापूर, ता. कराड) येथे ऊस तोडणी करत असलेल्या कामगारांना उसाच्या सरीत बिबट्याचे एक छोटे पिल्लू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर त्या बछड्याची मादी बिबट्याशी भेट घडवून आणण्यात यश मिळाले आहे.
आगाशिवनगर परिसरात शेतकरी विनोद शामराव शिंगण यांच्या शेतात ऊस तोड सुरू आहे. यावेळी ऊस तोड कामगारांना बिबट्याचे पिल्लू एका उसाच्या सरी आढळले. त्यानंतर ऊस तोड कामगारांनी याबाबतची माहिती संबंधित शेतकरी शिंगण यांना दिली. त्यानंतर शिंगण यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला आणि पुढील सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली. वनपाल आनंद जगताप यांच्या नेतृत्वाखालील मलकापूर रेंजच्या पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेत पिल्लू सुरक्षित ताब्यात घेतले.
सातारचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव व कराडचे वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळपर्यंत विशेष सेटअप तयार करण्यात आला. त्यानंतर पिल्लू आणि त्याची माता यांची सुरक्षितपणे भेट घडवून आणण्यात आली. वनविभागाच्या या संवेदनशील मोहिमेत वनपाल आनंद जगताप, वनरक्षक कैलास सानप, अक्षय पाटील, ठठढ सदस्य रोहित कुलकर्णी, अजय महाडिक, भरत पवार, अमोल माने, गणेश काळे, रोहित पवार, मयूर लोहाना, निलेश पाटील, संदिप व्हेल्हाळ व अनमोल शिंगण यांनी विशेष सहभाग नोंदवला.
घटनास्थळी शिवारातील शेतकऱ्यांना बिबट्याच्या हालचालींबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या घटनेमुळे शेतकरी, कामगार आणि वनविभाग यांच्यातील समन्वयाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून वन्यजीव संवर्धनाचा एक आदर्श नमुना तयार झाला आहे.