

तासवडे टोलनाका : वहागाव (ता. कराड) येथे कृष्णा नदीकाठी शेळी चारावयास घेऊन गेलेल्या शेतकर्याच्या शेळीच्या कळपावर भर दिवसा शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका शेळीच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. परंतु शेतकर्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. दरम्यान, या घटनेमुळे वहागावसह परिसर हादरला असून, ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत.
तळवीड, वहागाव, वनवासमाची, खोडशी या परिसरात यापूर्वी अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाले आहे. बिबट्यांनी परिसरातील शेतात असणार्या जनावरांच्या शेडमधील पाळीव प्राण्यावर हल्ले केले आहेत. त्यांना जखमी करून मारून टाकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच या परिसरातील अनेक कुत्रीही काही दिवसांपासून कायमचीच गायब झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी तळबीड गावात रात्रीच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याने नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यानंतर बिबट्याने तिथून डोंगराकडे धूम ठोकली होती. तसेच आठ दिवसांपूर्वीच बेलवडे हवेली गावात दोन शेतकर्यांच्या रेडकावर बिबट्याने हल्ला केला आहे.
दरम्यान, वहागाव येथील उत्तम अण्णा सोनुलकर हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास आपल्या शेळ्या कृष्णा नदीकाठी मळी नावाच्या शिवारात चरावयास घेऊन गेले होते. त्यावेळी झुडपातून बिबट्याने अचानक शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. हल्ला करणार्या बिबट्याची पूर्ण वाढ झाली होती. त्यामुळे उत्तम सोनूकर पहिल्यांदा घाबरून गेले. परंतु त्यानंतर त्यांनी सर्व शक्तीनिशी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. मात्र या हल्ल्यात बिबट्याने एका शेळीच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला असून ती शेळी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे वहागावसह परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत. त्यामुळे वन खात्याने तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
खोडशी, वहागाव, बेलवडे हवेली परिसरात नदीकाठी अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. तसेच वनवासमाची, तळबीड परिसरातील डोंगरात शेतकर्यांना बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाले आहे. दरम्यान परिसरात सध्या उसाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्याचा उसामध्ये मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही शेतकर्यांनी सावधगिरी बाळगावी, असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.