

आदेश खताळ
सातारा : सातारा पालिका निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली असली, तरी निकालानंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षांतर्गत राजकारण तापू लागले आहे. विशेषत: खा. श्री. छ. उदयनराजे भोसले गट आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले गट यांच्या गटात पालिकेतील वर्चस्वासाठी सुप्तसंघर्ष सुरू असून संशयकल्लोळ उडाल्याचे चित्र आहे. नगराध्यपद ना. शिवेंद्रराजे गटाकडे गेले असले तरी उर्वरित सत्ताकेंद्रांवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी खा. उदयनराजे गट आक्रमक झाला आहे. जादा पदे मिळण्यासाठी दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जाऊ लागल्याने पुन्हा संघर्ष उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.
सातारा पालिकेतील पदाधिकारी निवडी आठ दिवसांत होणार आहेत. उपनगराध्यक्षपद, प्रतोद पद, पाच स्वीकृत नगरसेवक तसेच शिक्षण, बांधकाम, पाणीपुरवठा, शहर नियोजन, विशेष मागासवर्गीय कल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण या सात सभापतिपदांच्या वाटाघाटी होणार आहेत. या पदाधिकारी निवडीत झुकते माप मिळण्यासाठी खा. उदयनराजे गट आक्रमक झाला आहे. तर नगराध्यक्षपद आमच्याकडे असले तरी उर्वरित पदांमध्ये समान वाटप हवे, अशी भूमिका ना. शिवेंद्रराजे गटाने घेतली आहे. त्यामुळे पदाधिकारी वाटपावरून दोन्ही गटांमध्ये पुन्हा संशयाचे, अविश्वासाचे वातावरण निर्माण निर्माण झाले आहे.
सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपांतर्गत उमेदवार वाटप करताना उदयनराजे गट व शिवेंद्रराजे गट यांच्यात सूत्रानुसार जागा वाटप झाले होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत बंडखोरी, अपक्षांची मुसंडी आणि क्रॉस व्होटिंग यामुळे अनेक प्रभागांत अनपेक्षित निकाल लागले. त्याचा थेट परिणाम सत्तासमीकरणांवर झाला आहे. निकालानंतर कोण कुणामुळे निवडून आले? याची आकडेमोड सुरू झाली असून त्यातूनच सध्या अविश्वासाचे वातावरण अधिक गडद होत चालले आहे.
विशेष म्हणजे, नगरसेवकपदाच्या तिकीट वाटपात जेवढा गोंधळ झाला, त्याहून अधिक गडबड आता पदाधिकारी निवडीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्वीकृत नगरसेवक, सभापतीपदे, स्थायी समिती सदस्य, प्रतोद या पदांच्या वाटाघाटीत दोन्ही गट सावध भूमिका घेत असल्याचे पालिका वर्तुळात दिसून येत आहे. खा. उदयनराजे गटाने उपनगराध्यक्षपदावर आपला पहिला हक्क असल्याचा दावा केला आहे. यासोबतच प्रतोद पद, तीन स्वीकृत नगरसेवक आणि चार विषय समित्यांचे सभापतीपद आणि स्थायी समितीवर जादा प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी हा गट आग्रही असल्याचे समजते. निवडणुकीत संख्याबळ आमचे अधिक आहे. त्यामुळे पदाधिकारी निवडीतही ते दिसले पाहिजे, अशी भूमिका या गटाची असल्याचे बोलले जात आहे.
नगरपालिकेतील बहुसंख्य नगरसेवक त्यांच्या गटाशी वैचारिक व राजकीयदृष्ट्या जवळचे आहेत. त्यामुळे निर्णयप्रक्रियेत त्यांचा प्रभाव अधिक असणे स्वाभाविक आहे. नगराध्यक्षपद एका गटाकडे देऊन उर्वरित सर्व पदांवरही त्याच गटाचे वर्चस्व राहणे अन्यायकारक ठरेल, असा युक्तिवाद या गटाकडून केला जात आहे. दुसरीकडे, शिवेंद्रराजे गट नगराध्यक्षपद आपल्याकडे असले तरी इतर पदाधिकारी निवडीत समान वाटा हवा, यावर ठाम आहे. आपण सर्वजण भाजपाचेच आहोत. त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर नव्हे, तर समन्वयातून पदवाटप झाले पाहिजे, असा सूर या गटातून उमटत आहे. नगराध्यक्षपदाची जबाबदारी मोठी असून प्रशासनाशी समन्वय, निर्णयांची अंमलबजावणी आणि जनतेसमोर उत्तरदायित्व ही कामे या पदाशी जोडलेली आहेत. त्यामुळे विषय समित्या आणि स्थायी समितीतही आमचा प्रभाव राहणे आवश्यक आहे, असल्याची भूमिका ना. शिवेंद्रराजे गटाची आहे.
नगरपालिका पदाधिकारी निवडीत बलाबलाचा निकष लावला जाणार की एक पक्ष एक सत्ता या तत्वानुसार समान वाटपावर एकमत होणार? हा जटिल प्रश्न आहे. दोन्ही गटाच्या बलाबलाचा निकष आवल्यास खा. उदयनराजे गटाला अधिक पदे मिळण्याची शक्यता आहे. मात्र तसे झाल्यास ना. शिवेंद्रराजे गटात असंतोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, समान वाटपाचा मार्ग स्वीकारल्यास काही पदासाठी इच्छुक असलेले नगरसेवक नाराज होण्याची शक्यता आहे. अनेक नगरसेवकांनी निवडणुकीत मोठा खर्च केला असून, आता पद मिळेल या अपेक्षेने ते दबाव टाकत आहेत. त्यामुळे दोन्ही गटांच्या नेत्यांसमोर सर्वांना खूष ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
सातारा पालिकेत भाजपची सत्ता आली असली, तरी ही सत्ता किती स्थिर राहील, याची खरी कसोटी आता लागणार आहे. पदाधिकारी निवडीत योग्य समतोल न साधल्यास अंतर्गत नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत बंडखोरीचा फटका बसल्याचा अनुभव ताजा असताना, पुन्हा एकदा गटबाजी वाढू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी आठ दिवसांत उपनगराध्यक्ष, प्रतोद, स्वीकृत नगरसेवक, सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे. त्यामुळे या काळात पडद्यामागील हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. कोणत्या गटाला किती पदे मिळतात, यावरून सातारा पालिकेतील सत्तेचे प्रत्यक्ष नियंत्रण कुणाकडे राहणार, हे स्पष्ट होणार आहे.सत्ता भाजपची असली तरी, तरी तिचा लगाम कुणाच्या हातात असेल, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. दोन राजेंचे मनोमीलन असले तरी पालिकेच्या राजकारणात सुरू असेली कुरघोडी ही येत्या काळात सातार्याच्या कारभाराची दिशा ठरवणारी ठरणार आहे.
सातारा पालिकेची निवडणूक झाली त्यावेळी खा. उदयनराजे गटाचे 8 अपक्ष होते. मात्र चार दिवसांत एका अपक्षाने ना. शिवेंद्रराजे यांना पाठिंबा दिला असून एका अपक्षाने तटस्थ भूमिका घेतल्याचे दिसते. त्यामुळे खा. उदयनराजे गटाला पाठिंबा देणारे 6 अपक्ष उरले आहेत. मात्र उदयनराजे गटाला मूळ भाजपच्या अधिकृत 2 उमेदवारांनी पाठिंबा दिला आहे. भाजपचे 2 उमेदवार तटस्थ आहेत. शिंदे गटाचा उमेदवारही उदयनराजे गटात सामील झाला. अपक्षांना सोबत घेऊन संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही राजे गटांकडून सुरू असल्याचे दिसते.