Satara News : मार्ली-भिलार घाटात दरड कोसळली

महाबळेश्वर-जावलीला जोडणारा प्रमुख मार्ग ठप्प
Landslide News
मार्ली-भिलार घाटात दरड कोसळली
Published on
Updated on

कुडाळ : मेढा-मार्ली मार्गे भिलार जाणाऱ्या घाट रस्त्यावर बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण दरड कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगराचा भलामोठा कडा आणि मातीचा मोठा ढिगारा थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घटना घडली ती वेळ रात्रीची असल्याने सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही, परंतु यामुळे या भागातील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

​महाबळेश्वर आणि जावली या दोन महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा हा अतिशय जवळचा आणि सोयीचा मार्ग मानला जातो. दररोज या मार्गावरून स्थानिक ग्रामस्थ, चाकरमाने आणि पर्यटक मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. परंतु, काल रात्री दरड कोसळल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून रस्ता मार्गस्थ होणे अशक्य झाले आहे. प्रशासनाकडून आणि स्थानिक पोलिसांकडून या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि वाहनधारकांना या रस्त्याने न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग खचून ही दरड कोसळल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रस्ता बंद झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या असून पर्यटकांसह स्थानिकांचे मोठे हाल होत आहेत. ​दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून संबंधित प्रशासनाने, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तात्काळ जेसीबी आणि आपत्कालीन यंत्रणा पाचारण करून ही दरड बाजूला करावी, अशी तीव्र मागणी जोर धरत आहे. लवकरात लवकर रस्ता सुरक्षित आणि मोकळा करून वाहतूक पूर्ववत करावी, अशी विनंती नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news