

चंद्रजीत पाटील
कराड : पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य साखर कारखान्यांपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या कृष्णा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक १४ मे अथवा त्यापूर्वी केव्हाही जाहीर होऊ शकते. कारखान्याची अंतिम मतदार यादी ४ मे रोजी प्रसिद्ध झाली असून, कायद्यानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १० दिवसांत निवडणूक जाहीर होते. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक १४ मे पूर्वी केव्हाही जाहीर होऊ शकते आणि त्यामुळेच जून महिन्यात कारखान्यासाठी मतदान होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
कारखान्याची प्रारूप मतदार यादी मागील महिन्यात ४ एप्रिलला निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर ही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येऊन ९ एप्रिलपासून २० एप्रिलपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. या मुदतीमध्ये रेठरे खुर्द येथील बापूसाहेब साळुंखे यांची एकमेव हरकत दाखल झाली होती. दाखल हरकती व सूचनांवर प्रादेशिक सहसंचालक पुणे विभागीय कार्यालयात सुनावणी झाली होती.
यावेळी साळुंखे यांनी रेठरे खुर्द मधील एका महिला मतदाराविरोधात आक्षेप नोंदवित पुरावे सादर केले होते. त्याचबरोबर अन्य चार मतदाराविरोधात सुद्धा आक्षेप नोंदविण्यात आला होता. मात्र साळुंखे यांनी त्याबाबतचे पुरावे सादर केले नव्हते. कारखाना प्रशासनाने याबाबत आपली भूमिका सुनावणीवेळी स्पष्ट केली होती. त्यानंतर बुधवार, २९ एप्रिलला साळुंखे यांच्या हरकतीवर निकाल जाहीर करण्यात आला.
साळुंखे यांचा आक्षेप व त्यांनी दिलेले पुरावे ग्राह्य मानत रेठरे खुर्द मधील एका महिला मतदाराचे नाव वगळण्यात आले असून पुरावे सादर न केल्याने अन्य मतदारांची नावे वगळण्यात आलेली नाहीत. तसेच सोमवार, ४ मे रोजी कारखान्याची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली असून आता हे सर्व मतदार कारखाना निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १० दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया जाहीर केले जाणे बंधनकारक आहे. त्यामुळे १४ मे अथवा त्यापूर्वी केव्हाही निवडणूक जाहीर होऊ शकते आणि म्हणूनच आता जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
आठवडाभरात केव्हाही कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यामुळेच जून २०२६ मध्ये कारखान्यासाठी मतदान होईल. मतदानानंतर एक ते दोन दिवसांत मतमोजणी होणार असून कारखान्याचा कारभार कोणाकडे जाणार, हे स्पष्ट होणार आहे.
कराड :सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दुरंगी होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले गटाविरोधात यापूर्वीच माजी चेअरमन अविनाश मोहिते गटाने शड्डू ठोकला आहे. निवडणूक तोंडावर येऊनही डॉ. इंद्रजित मोहिते समर्थक फारसे सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळेच सद्यस्थितीत कारखाना निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता अधिक आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कारखान्यांपैकी एक कारखाना म्हणून ओळखला जातो. सातारा जिल्ह्यातील कराड आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा कारखान्याच्या सभासदांची संख्या मोठी आहे. याशिवाय सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, खानापूर, पलूस या तालुक्यातही कारखान्याचे सभासद आहेत. कृष्णा कारखान्यावर मागील ११ वर्षांपासून भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या गटाची सत्ता असून त्यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे आपल्या सहकाऱ्यांसह कारखान्याची धुरा वाहत आहेत.
आमदार अतुलबाबा भोसले हे प्रत्यक्ष संचालक मंडळात नसले तरी त्यांचे वडील डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने जून २०२१ मध्ये झालेल्या कारखाना निवडणुकीत ११ हजाराहून अधिकच्या मताधिक्याने मोठा विजय मिळविला होता. पाच वर्षांपूर्वी तिरंगी लढत झाली होती आणि विरोधी डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते या दोन्ही माजी चेअरमन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सुमारे सहा ते साडेसहा हजार मतांवर समाधान मानावे लागले होते.
आता कारखाना निवडणूक तोंडावर आली असून मागील काही महिन्यांपासून माजी चेअरमन अविनाश मोहिते गट सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कार्यक्षेत्रातील गावोगावी भेट देऊन मतदारांशी या गटाकडून संवाद साधला जात आहे. त्याचवेळी सत्ताधारी गटाकडून चेअरमन डॉ. सुरेश भोसले, आमदार अतुलबाबा यांच्यासह त्यांचे बंधू विनायक भोसले हे कराड तालुक्यासह वाळवा, पलूस, खानापूर, कडेगाव या तालुक्यात विविध नेते, पदाधिकारी यांची भेट घेत साखर पेरणी करत आहेत. त्यामुळेच यंदाची निवडणूक दुरंगीच होण्याची शक्यता अधिक आहे.
ज्येष्ठ विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते यांचे पुत्र माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते हे मागील चार दशकांचा विचार करता प्रथमच या निवडणुकीत फारसे सक्रिय दिसत नाहीत. मात्र असे असले तरी त्यांनी निवडक सहकाऱ्यांशी चर्चा करत त्यांची मते जाणून घेत निवडणुकीबाबत चर्चा केली आहे. त्यामुळेच डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची काय भूमिका असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.