Krishna Bank | कृष्णा बँकेला ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनतर्फे मुंबई येथे पुरस्कार प्रदान
Krishna Bank |
मुंबई : ‘पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते स्वीकारताना कृष्णा सहकारी बँकेचे पदाधिकारी.Pudhari Photo
Published on
Updated on

कराड : कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्णा सहकारी बँकेला मुंबई येथे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन च्यावतीने सन 2023-24 साठीचा ‘पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते कृष्णा बँकेच्या संचालकांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन’च्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या बँकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. या संस्थेने राज्यातील 500 कोटी ते 1000 कोटी रूपयांपर्यंतच्या ठेवी असणार्या नागरी सहकारी बँकांची पाहणी करून, या विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची निवड या पुरस्कारासाठी केली.

कृष्णा बँकेने चेअरमन आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विस्तार केला असून, सामान्य माणसांसाठी कार्य आणि सभासद हिताचा कारभार या उद्दिष्टाने बँकेने वाटचाल सुरु ठेवली आहे. बँकेच्या कार्याची नोंद घेऊन बँकेला सन 2023-24 साठीचा ‘पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचा 26 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यात सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते कृष्णा बँकेला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, हर्षवर्धन मोहिते, विजय जगताप, संतोष पाटील, दिलीपराव पाटील, प्रदीप पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी बोलताना ना. भोयर म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे बँकेच्या पारदर्शक, ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीची राज्य पातळीवर झालेली अधिकृत दखल आहे. आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत सहकारी बँकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. पारदर्शक व्यवहार, तांत्रिक सक्षमता आणि ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक सेवा पोहोचवणे ही सहकार क्षेत्राची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. सहकार क्षेत्रातील सर्व बँकांनी सामूहिकतेने, सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास भविष्यात मोठे चांगले बदल शक्य आहेत. याप्रसंगी व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष भाऊ कड, उपाध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदींसह बँकींग क्षेत्रातील मान्यवर व विविध बँकांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news