Koyna dam: कोयनेत 32.867 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती

यंदा जादा पाणी आवक; पूर्व, पश्चिम प्रकल्पांसाठी 100.24 टीएमसी पाणीवापर
Koyna Dam
Koyna Dam
Published on
Updated on
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : कोयना धरणांतर्गत जलाशयात या जलवर्षात मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी तुलनात्मक जादा पाण्याची आवक व मुबलक पाणीसाठा असल्याची समाधानकारक परिस्थिती आहे. असे असली तरी गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 32.867 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

मध्यंतरी जलविद्युत प्रकल्पांतर्गत दुरुस्तीची कामे सुरू असल्याने त्याकाळात कमी वीजनिर्मिती झाली होती. तर यावर्षी सिंचनाची वाढती गरज व भविष्यातील सिंचनाची गरज भागवताना मग ही वीज निर्मितीची तुट भरून काढणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

या जल वर्षात अकरा महिन्यात कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 57.80 टीएमसी पाण्यावर 2633.253 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी 59.30 टीएमसी वर 2710.722 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे 1.50 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने 77.469 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. यावर्षी आत्तापर्यंत सिंचनासाठी 27.91 टीएमसी पाणी सोडण्यात आले. याशिवाय धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पूरकाळात सोडलेल्या 14.53 टीएमसी अशा एकूण 42.44 टीएमसी पाण्यावर 200.021 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या 24.36 व पूरकाळातील 9.10 अशा एकूण 33.46 टीएमसी पाण्यावर 155.419 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 8.98 टीएमसी पाणीवापर जादा झाल्याने 44.602 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.

चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता या अकरा महिन्यात एकूण 100.24 टीएमसी पाण्यावर 2833.274 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी 92.76 टीएमसी पाण्यावर 2866.141 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत 7.48 टिएमसी पाणीवापर जादा झाला असला तरी 32.867 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे. यावर्षी पश्चिमेकडे कमी आणि पूर्वेकडे जादा पाणीवापर झाल्यानेच वीजनिर्मितीत गतवर्षीच्या तुलनेत ही जादा तूट पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news