

पाटण : महाराष्ट्राच्या ऊर्जा विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पास 64 वर्षे पूर्ण होत आहेत. पोफळी येथील कोयना टप्पा 1 व 2 प्रकल्पाला 16 मे 1962 रोजी प्रारंभ झाला होता आणि त्यानंतर 64 वर्षे 1 हजार मेगॅवॅट क्षमतेचा हा वीज प्रकल्प राज्याला उजेड देत आहे.
भारतीय अभियंत्यांच्या तांत्रिक कौशल्याचा उत्कृष्ट नमुना मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक भागाची वीज गरज भागवली जाते. कोयना धरणातून सिंचनासोबतच पश्चिमेकडे पोफळी, अलोरे व कोळकेवाडी येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कोयना प्रकल्पांची एकूण वीज निर्मिती क्षमता 1960 मेगावॅट असून, दरवर्षी सुमारे साडेतीन ते पावणेचार हजार दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली जाते.
माफक दरातील आणि प्रदूषणमुक्त वीज निर्मितीमुळे कोयना प्रकल्प राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात आजही आघाडीवर आहेत. लेक टॅपिंगसारख्या धाडसी प्रयोगांमुळे कोयना चौथा टप्पा वर्षभर सुरळीत चालू राहण्यास मदत झाली. त्यामुळे उन्हाळ्यातील भारनियमनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी झाला. 1967 साली झालेल्या विनाशकारी भूकंपासह लाखो लहान-मोठे भूकंपाचे धक्के सहन करूनही कोयना धरण आणि प्रकल्प आजही मजबूत व सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
1960 मेगॅवॅट क्षमतेच्या या प्रकल्पात पूर्वेकडे धरणातून जे पाणी सिंचनासाठी सोडण्यात येते, त्या पाण्यावर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या धरण पायथा वीजगृहातून 20 मेगावॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे 40 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येते. तब्बल 1920 मेगावॅट वीज निर्मिती ही पोफळी, कोयना चौथा टप्पा, अलोरे या जलविद्युत प्रकल्पातून केली जाते. धरणात आता 105.25 टीएमसी पाणी साठवले जाते. या साठवलेल्या पाण्यापैकी पश्चिमेकडील प्रकल्पांसाठी एक जून ते 31 मे या तांत्रिक जलवर्षासाठी 67.50 टीएमसी पाणी हे पाणीवाटप लवादानुसार वीज निर्मितीसाठी आरक्षित आहे.