Satara Rain : कोयनेचे दरवाजे सात फुटांवर; विसर्ग वाढणार
पाटण : पुढारी वृत्तसेवा
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात बुधवार, गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर काहीसा मंदावला होता. त्यामुळे धरणाचे दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवण्याच्या निर्णय घेत धरण व्यवस्थापनाने कोयना नदीपात्रात 32 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला. मात्र धरणांतर्गत विभागात रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने आज, शनिवारी सकाळी नऊ वाजता धरणून विसर्ग वाढवण्यात येणार आहे. यात सहा वक्री दरवाजातून 40 हजार तर पायथा वीजगृहातून 2100 असे प्रतिसेकंद 42,500 क्युसेक्स पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. दरम्यान, धरणात 81.64 टीएमसी पाणीसाठा झाला असून प्रतिसेकंद 57 हजार 917 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात दुपारपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. गुरुवारी धरणाचे सहा वक्री दरवाजे चार फूट उचलून त्यातून पाणी सोडण्यात येत होते. शुक्रवारी सकाळी पुन्हा हे दरवाजे सात फूट उचलण्यात आले. यातून 30 हजार तर पायथा वीजगृहातील 20 मेगॅवॅट क्षमतेच्या दोन्ही जनित्रांद्वारे 40 मेगॅवॅट वीजनिर्मिती करून 2,100 असे प्रतिसेकंद 32,100 क्युसेक पाणी सध्या पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पूर्वेकडील विभागातील पाऊस व धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने नदीकाठची गावं, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील चोवीस तासात धरण पाणीसाठ्यात 3.35 टीएमसीने वाढ झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 23.61 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. गुरुवार संध्याकाळी पाच ते शुक्रवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात कोयना 143 मि.मी., नवजा 133 मि.मी., तर महाबळेश्वर 230 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.

