

पाटण : महाराष्ट्राची वरदायिनी मानले जाणारे कोयना धरण ५० टक्के भरले आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला असून शुक्रवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत २४ तासांत कोयना धरणात केवळ १.६१ टीएमसी पाण्याची आवक झाली होती. सद्यस्थितीत धरणात ५२.३७ टीएमसी इतका पाणीसाठा असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अजूनही जवळपास ५२.९८ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
सलग अनेक दिवस धुवाँधार कोसळल्यानंतर कोयना धरण परिसराने अखेर पावसापासून काहीशी उसंत घेतली आहे. धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरल्याने बहुतांश ठिकाणी उन्हाळ्यासारखी परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून छोट्या नद्या, नाले, ओढे आणि धबधब्यांतील पाण्याचा प्रवाहही लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. पावसाची तीव्रता कमी झाल्याने सध्या कोयना धरणात प्रतिसेकंद सरासरी २०,२३१ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
मात्र, यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम म्हणून बुधवार सायंकाळी पाच ते गुरुवार सायंकाळी पाच या २४ तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात १.६१ टीएमसीची भर पडली असून पाणीपातळीत १.१० फुटांनी वाढ झाली आहे. सध्या धरणात एकूण ५२.३७ टीएमसी, तर उपयुक्त ४७.२५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असलेले कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून ५२.९८ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, बुधवार सायंकाळी पाच ते गुरुवार सायंकाळी पाच या कालावधीत कोयना येथे ८, नवजा येथे ३ आणि महाबळेश्वर येथे ७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर १ जूनपासून आतापर्यंत कोयना येथे १,६४०, नवजा येथे १,९१४ आणि महाबळेश्वर येथे २,३३४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद जलसंपदा विभागाने केली आहे.