

पाटण : कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. धरणांतर्गत विभागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरअंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सरासरी ३१,४७० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. बुधवार संध्याकाळी पाच ते गुरुवार संध्याकाळी पाच या २४ तासांत धरणात ६.१९ टीएमसीने तर पाणी उंचीत ७.०१ फुटांनी वाढ झाली आहे.
सध्या कोयना धरणात उपलब्ध ५०.७६ टीएमसी तर उपयुक्त ४५.६४ टीएमसी पाणीसाठा आहे. बुधवार संध्याकाळी पाच ते गुरुवार संध्याकाळी पाच या २४ तासांत कोयना ८८ मिलिमीटर, नवजा १३४ मिलिमीटर, महाबळेश्वर ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून ५४.४९ टीएमसी पाण्याची गरज आहे.
दरम्यान पाटण तालुक्यात या पावसाळ्यात १०९ घरांची पडझड झाली असून दोन म्हशी व एक शेळी दगावली आहे. दगावलेल्या दोन पशुधनाचे पैसे नुकसानभरपाई म्हणून संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. पावसाचे पाणी घुसल्याने स्थानिक ४४ घरे व ३४ दुकानांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याखाली गेलेले काही पूल, साकव पूर्ववत झाल्याची माहिती तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली.