

पाटण : कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. धरणातून कोयना व कृष्णा नदीला सोडलेल्या पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठीच करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. शेती, खासगी तसेच औद्योगिक पाणी उपसा योजनांवर बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनंतर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करत प्रतिसेकंद १ हजार ५० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. हे पाणी कोयना धरण ते सांगली जिल्ह्यातील हरिपूर परिसरापर्यंतच्या पिण्याच्या पाणी योजनांसाठीच वापरण्यात येणार आहे. सध्या कोयना धरणात केवळ १५.५६ टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त साठा १०.४४ टीएमसी इतकाच शिल्लक आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.
अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधितांचा पाणी परवाना व वीजपुरवठा एका वर्षासाठी बंद करण्यासह उपसा यंत्रणा जप्त केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच नदीपात्रात औद्योगिक अथवा सांडपाणी सोडून पाण्याचे प्रदूषण करू नये. तसेच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.