

पाटण : महाराष्ट्राची वरदायीनी कोयना धरणातून वर्षांनुवर्षे सर्वसामान्यांची तहान भागवत त्यांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे कामही होते. उन्हाळ्यात पाण्यासाठी तर पावसाळ्यात पाण्यामुळे धरणातील पाण्याविषयी चिंता पहायला मिळते. उन्हाळा व पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांचेही लक्ष धरणावर अवलंबून असते.
इतरांच्या जीवनात प्रकाश टाकत त्यांची तहान भागवणार्या याच पाण्यावर स्थानिक अनेक गावांचे जीवन मात्र अद्यापही कोरडेच असल्याचे भीषण वास्तव आहे. स्थानिकांचे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तर पावसाळ्यात पाण्यामुळे सार्वत्रिक हाल होतात. याकडे मात्र शासन, प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते ही खेदाची बाब आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाचे चटके वाढायला लागले आणि राज्यभर पाणीटंचाई जाणवू लागली की आपोआपच सर्वांच्या नजरा कोयना धरणातील पाण्याकडे वळतात. उन्हाळ्यात सातत्याने धरणात किती पाणी आहे, शेवटपर्यंत पुरेल का याची काळजी लागते. एक जून ते एकतीस मे अशा तांत्रिक जलवर्षात कोयना धरणाचा कारभार चालतो, त्यामुळे 31 मे पर्यंत पाणीसाठा पुरेल का याची चिंता असतानाच धरण वर्षांनुवर्षे सर्वांना सार्वत्रिक दिलासा देते हा इतिहास आहे.
जून,जुलै महिन्यात अपेक्षित पावसाला सुरुवात होते आणि मग त्यानंतर पुन्हा सर्वांच्याच नजरा धरण पूर्ण क्षमतेने भरेल का याकडे लागते. त्यामुळे अधूनमधून पाऊस, अतिवृष्टीचा आढावा घेतानाच अगदी शासन, प्रशासनासह सर्वसामान्यांनाही धरण भरण्याची आस लागते. एकदा का धरण पूर्ण क्षमतेने भरले किंवा भरण्याच्या टप्प्यात आले की मग पूर्वेकडील विभागांना धरणातून कधी व किती पाणी सोडणार याची चिंता व काळजी वाटते. धरणांतर्गत पडणारा मोठ्या प्रमाणावरील पाऊस त्याचवेळी पूर्वेकडील विभागातही जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि अशा काळात धरणातून मोठ्या प्रमाणावर विनावापर पाणी सोडले तर कोयना नदी व कराडपासून पुढे कृष्णा नदीला महापूर येतो. याचा फटका सातारा, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना बसतो, त्यामुळे त्यावेळची चिंता ही वेगळीच असते.
कोयना धरण म्हटलं की निश्चितच एका बाजूला दिलासा तर दुसरीकडे सातत्याने वर्षभर या ना त्या प्रकारे काळजी व चिंतेचा विषय असल्याने कोयना वर्षभरच सर्वांच्या ओठावर व डोक्यात असते ही वस्तुस्थिती आहे. त्याचवेळी ज्या कोयना भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून हे धरण उभे केले त्यांच्या आयुष्यात तब्बल 65 वर्षानंतरही कमालीचा अंधार व घशाची कोरड भागवण्यात अद्यापही अपयश आले आहे याचाही किमान विचार व्हावा अशाही भूमिपुत्रांच्या अपेक्षा असतात.
यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाची सुरुवात झाली असून सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. याच काळात धरणात सरासरीच्या तुलनेत जादा पाणीसाठा झाला आहे. आता धरणाच्या सहा वक्री दरवाजातून विनावापर व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून असे पूर्वेकडे कोयना नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. पाऊस लागून राहिला तर पूरस्थिती निर्माण होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय उपाययोजना तितक्याच महत्त्वाच्या आहेत.