

पाटण : कोयना धरण क्षेत्रात सध्या दमदार पाऊस सुरू असून धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. सध्या धरणात ८४.७७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून आता केवळ २०.४८ टीएमसी साठवण क्षमता शिल्लक राहिली आहे.
सध्या धरणात सरासरी २५,२९३ क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे वाढता पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलण्यात आले. या दरवाजांतून ५,०७९ क्युसेक आणि धरण पायथा वीजगृहातून १,०५० क्युसेक, असे एकूण ६,१२९ क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
धरणातून सोडलेल्या पाण्यासह पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पडणारा पाऊस, यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीकाठची गावे, लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, धरणात ज्या पटीत पाण्याची आवक वाढेल त्यादृष्टीने येणाऱ्या काळात पूर्वेकडे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल.
कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वरअंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी २५,२९३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या उपलब्ध ८४.७७ टीएमसी, तर उपयुक्त ७९.६५ टीएमसी पाणीसाठा आहे.
१ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस कोयना २,७९०, नवजा ३,३६२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासांत धरणात १.७९ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ २०.४८ टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या धरण ८०.५४ टक्के भरले आहे.