

मुंबई : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहसिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने घेतला असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
कोयना जलसागरास यापूर्वी ‘शिवाजी जलसागर’ या नावाने संबोधले जात होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख योग्य नसल्याने नावामध्ये बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव कोयना जलशायला द्यावे, अशी मागणी होत होती.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलशयाचे नामांतर करण्याबाबत विनंती केली होती. महायुती सरकारने याबाबतचा शासन आदेश जारी करून कोयना जलसागराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. जलसागराचे नामांतर करण्याची शिवप्रेमी नागरिकांची मागणी आणि जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल विखे-पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.