

पाटण : एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक जलवर्षापैकी पहिल्याच जून महिन्यात तब्बल 32 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. एक जून रोजी नवीन जल वर्षारंभाला 23.12 टीएमसी शिल्लक पाणीसाठ्यावर सुरुवात झाली. सध्या धरणात तब्बल 52.08 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा भविष्यातील सिंचनासह वीज निर्मितीची सार्वत्रिक चिंता मिटवणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सध्याचा पाणीसाठा एका बाजूला समाधानकारक असला तरी जुलै, ऑगस्टमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर पूर, महापूराची डोक्यावर धोक्याची टांगती तलवार राहण्याच्या शक्यताही नाकारता येत नाहीत. कोयनेसह महाबळेश्वरमध्येही सरासरीच्या तुलनेत दुप्पट पाऊस आतापर्यंत झाला आहे. मागील दहा वर्षांची नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता चालू वर्षी मे महिन्याच्या अखेरीपासूनच सुरू झालेला पाऊस जून महिन्यातही मोठ्या प्रमाणावर स्थिरावला आहे. यापुढच्या जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाचे नैसर्गिक चित्र कशा पद्धतीचे राहील यावरच धरणाची बहुतांशी तांत्रिक व नैसर्गिक परिस्थिती अवलंबून राहणार आहे.
या जलवर्षात पहिल्याच महिन्यात 31.84 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यापैकी पश्चिम वीजनिर्मितीसाठी 2.30, पूरकाळातील 0.92 टीएमसी पाणी हे वीजनिर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. धरणात सध्या 52.08 टीएमसी पाणी शिल्लक आहे. या महिन्यात कोयना 1502 मिलिमीटर, नवजा 1279 मिलिमीटर, महाबळेश्वर 1403 मिलिमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे. मागील तांत्रिक जलवर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. मात्र अचानक मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याचा कमी वापर झाला तर लवादाच्या आरक्षणानुसार पश्चिम वीजनिर्मितीसाठी पाणीवापर झाला होता. मात्र सरतेशेवटी सरासरीच्या तुलनेत ज्यादा पाणीसाठा शिल्लक राहिल्याने निश्चितच त्या द़ृष्टीनेही आगामी काळातील नियोजन महत्त्वाचे आहे.
मागील दहा वर्षांची सरासरी लक्षात घेता जून महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित पाऊस पडतो. मात्र त्यानंतर गायब झालेला पाऊस हा जुलैच्या दुसर्या पंधरवड्यात सुरू होतो आणि ऑगस्ट अखेर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, हा इतिहास आहे. मात्र चालूवर्षी मे, जूनमध्ये सरासरी पेक्षाही अधिक पाऊस झाल्याने यावर्षी तुलनात्मक जादा पाणीसाठा सध्या धरणात शिल्लक आहे. त्यामुळे एका बाजूला समाधान तर दुसरीकडे चिंतेचा विषय बनलेला हा पाणीसाठा धरण व्यवस्थापन व वीजनिर्मिती कंपनी यांच्या नियोजनात्मक कारभाराची कसोटी ठरणार आहे.