

पाटण : महाराष्ट्राची वरदायीनी व राज्यातील एक महत्त्वपूर्ण धरण व जलविद्युत प्रकल्प असलेल्या कोयना प्रकल्पातून मार्च, एप्रिल या अवघ्या दोन महिन्यात रेकॉर्डब्रेक अशी तब्बल 1155.371 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.
एक जूनपासून सुरू झालेल्या धरणाच्या तांत्रिक जलवर्षात आत्तापर्यंत एकूण 2866.141 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्यापैकी फेब्रुवारीपर्यंतच्या नऊ महिन्यात 1710.770 तर अवघ्या मार्च, एप्रिल या दोन महिन्यात 1155.371 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. या दोन महिन्यांत पश्चिमेकडे 24.46 तर पूर्वेकडे सिंचनासाठी 11.17 अशा एकूण 35.63 टीएमसी पाण्यावर ही वीजनिर्मिती करण्यात आली आहे.
गतवर्षी कोयना धरणात 112 टीएमसी पाण्याची आवक झाली तर सिंचनासाठी ऐतिहासिक 38 टीएमसी पाणीवापर झाला होता. कमी पाणी साठ्यामुळे ऐन उन्हाळ्यात पश्चिम वीजनिर्मितीच्या लवादाला कात्री लागल्याने वीजनिर्मिती कमी झाली होती. यावर्षी धरणात 183.61 टीएमसी पाण्याची आवक तर अकरा महिन्यानंतरही धरणात अपेक्षित पाणीसाठा शिल्लक आहे.
मार्च व एप्रिल या दोन महिन्यात पश्चिमेकडे 24.46 टीएमसी पाण्यावर पोफळी टप्पा एक व दोन मधून 199.752 दशलक्ष युनिट, कोयना चौथा टप्पा 712.195 दशलक्ष युनिट, अलोरे वीजगृह 194.898 दशलक्ष युनिट अशी 1106.845 दशलक्ष युनिट तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या 11.17 टीएमसी पाण्यावर धरण पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती करुन 48.526 दशलक्ष युनिट अशी एकूण 35.63 टीएमसी पाण्यावर 1155.371 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे.
ऐन उन्हाळ्यात राज्याला भारनियमनाच्या त्रासापासून सार्वत्रिक दिलासा देण्यात व शेती व पिण्यासाठी सिंचनाला प्राधान्य देत निम्म्याहून अधिक महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांची सिंचनाची गरज भागवणारे हे कोयना धरण निश्चितच सार्वत्रिकदृष्ट्या सकारात्मक ठरत आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
गतवर्षी धरणात कमी प्रमाणात पाण्याची आवक झाली असतानाही फेब्रुवारी अखेर या वर्षाच्या तुलनेत जादा वीजनिर्मिती झाली होती. मात्र ती तूट भरून काढत या दोन महिन्यात धरणातील पाण्यावर तब्बल 1155 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल 666 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली ही निश्चितच समाधान व अभिमानास्पद बाब मानली जात आहे.