

मुंबई/ पाटण : कोयना धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहाच्या प्रलंबित कामास राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळाला असून पूर्वेकडे सिंचनासह अतिरिक्त वीज निर्मितीचा मार्ग मोकळा होणार असल्याने याबाबत आनंद व्यक्त केला जात आहे.
कोयना धरण पायथ्याशी असलेल्या 40 मेगॅवॅट डावा तीर विद्युत गृहाचे काम वर्षांनुवर्षे अपूर्ण स्थितीमध्ये होते. या कामास सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मध्यंतरी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालनात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह पाटण विधानसभा प्रचार प्रमुख विक्रमबाबा पाटणकर, तालुका प्रमुख नंदकुमार सुर्वे आदी भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संबंधित अधिकार्यांसोबत बैठक झाली. त्यावेळी या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर ना. विखे पाटील यांनी लवकरात लवकर याबाबतची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी मिळाली आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील मंजुरीनंतर भाजपाचे पाटण विधानसभेचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, युवा उद्योजक याज्ञसेन पाटणकर, नंदकुमार सुर्वे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले आहेत.