

पाटण ः वेळेवर आलेला मान्सून आणि मे महिन्यापासून पडत असलेला पाऊस यामुळे महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्या कोयना धरणात यंदा जादा पाणीसाठा आहे. मात्र, आता हाच चिंतेचा विषय बनला असून शिवसागर जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्याचवेळी अत्यल्प प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अजूनही धरणाच्या वक्री दरवाजापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळेच या दरवाजातून पाणी सोडणे शक्य नाही. सध्यस्थितीत केवळ पायथा वीजगृहातील एकच जनित्र सुरू आहे. त्यामुळेच या आव्हानात्मक काळात जर धरण पायथ्याशी असलेल्या विमोचक दरवाजातून पाणी सोडले गेले, तर एका बाजूला पाणी पातळी नियंत्रित होईल. त्याचबरोबर दुसरीकडे धरणातील गाळ मोठ्या प्रमाणावर बाहेर पडण्यासाठी चांगली संधी उपलब्ध होईल. सर्वात महत्त्वाचे पाटणसह कराड तालुका आणि सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य महापुराचा धोकाही काही प्रमाणात कमी करणे सहजशक्य होणार आहे. त्यासाठी आता विमोचक दरवाजातून शक्य तितके पाणी लवकरात लवकर सोडावे आणि पाणी पातळी नियंत्रित करावी, असे मत जल तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. हा पाऊस अजूनही कायम आहे. सध्या धरणात 67.50 टीएमसी पाणीसाठा झाला असून शिवसागर जलाशयात प्रतिसेकंद सरासरी 30 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्याचवेळी पूर्व आणि पश्चिम प्रकल्पातून प्रतिसेकंद सरासरी दोन हजार क्युसेक इतकाच पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही वर्षांचा इतिहास लक्षात घेता 15 जुलै ते अगदी ऑगस्ट महिना संपेपर्यंत कोयना जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होते. तसेच याच काळात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्याचवेळी सातारा जिल्ह्यातील उर्वरित विभागांसह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास महापुराचा धोका निर्माण होतो, हा दरवर्षीचा अनुभव आहे.
सध्या कोयना नदी पात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता उपलब्ध आहे. तर धरण पायथ्याशी असलेल्या एका जनित्राचे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे केवळ एका जनित्राद्वारेच वीज निर्मिती करून कोयना नदीत पाणी सोडण्यात येत आहे. अशा काळात जर धरण पायथ्याशी असलेल्या विमोचक दरवाजातून पाणी सोडले, तर प्रतिसेकंद सरासरी 3 हजार क्युसेक पाणी यातून बाहेर पडेल. सोबतच विमोचक दरवाजे पायथ्याजवळ असल्याने यातून सोडलेल्या पाण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर धरण पायथ्याशी साठलेला गाळही कोयना नदी पात्रातून वाहून जाण्यास मदतच होणार आहे. सर्वात महत्त्वाचे यामुळे धरण आणि गाळ याबाबत असलेली चिंताही दूर होईल. महापुराचा धोकाही काही प्रमाणात कमी होणार आहे. या सर्व बाबींचा विचार होऊन प्रशासकीय तसेच शासकीय पातळीवर सकारात्मक निर्णय होणे आवश्यक असल्याचे मत जल तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणी उंची 2133.6 फुटांवर जाते, तेव्हा पाणी धरणाच्या सहा वक्री दरवाजापर्यंत पोहोचते. रविवारी सकाळी पाणी उंची 2125.11 फुटापर्यंत होती. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आणखी तीन ते चार दिवस वक्री दरवाजापर्यंत पाणी पोहोण्याची प्रतीक्षाच करावी लागेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच भविष्यात मोठा पाऊस झाल्यास धरणात ज्या प्रमाणात पाण्याची आवक होईल, त्याच प्रमाणात पाण्याचा विसर्ग कोयना नदीत करावा लागेल. तसेच यामुळे सातारा जिल्ह्यातील पाटण, कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका सहन करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.