

पाटण : कोयना धरणातील पाण्याअभावी मे महिन्यात जलविद्युत निर्मिती ठप्प झाली तर पूर्वेकडे सिंचनाचे पाणी बंद करून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्याची दुर्दैवी वेळ आली. नव्या तांत्रिक जलवर्षात जून महिना पूर्ण कोरडा गेला पण जुलैसह ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस होऊनही आत्तापर्यंतच्या तीन महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १७६.९२० दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाल्याने कोट्यवधीचा महसूल पाण्यात गेला आहे.
दरम्यान याच काळात तब्बल २५.३५ टीएमसी पाणी पुर्वेकडे विनावापर वाया घालवण्यात आले असून आता धरणाची पाणी साठवण क्षमता संपुष्टात आल्याने यानंतरही मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाणार आहे. याच विनावापर वाया जाणाऱ्या पाण्याचा सकारात्मक वापर झाला असता तर विजेची तूट भरून निघत कोट्यवधीचा महसूलही मिळाला असता मात्र याबाबत अद्यापही सकारात्मक ध्येयधोरणे राबवली जात नाहीत हीच वस्तुस्थिती समोर येत आहे.
या जल वर्षांत आत्तापर्यंतच्या तीन महिन्यात कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे ७.१६ टीएमसी पाण्यावर ३४६.६५३ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी १०.६१ टीएमसी वर ४९४.९५० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे ३.४५ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने १४८.२९७ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.
पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. यावर्षी सुरुवातीला सिंचनापेक्षा पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देण्यात आले, यासाठी सोडलेल्या १.३१ व पूरकाळात १.८२ अशा ३.१३ टीएमसी पाण्यावर १२.६९५ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी लवकरच पाऊस सुरू झाल्याने सिंचनासाठी त्या काळात पाणी सोडण्यात आले नव्हते परंतु पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सोडलेल्या ८.९६ टीएमसी पाण्यावर ४१.३१८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी ५.८३ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने २९.११८ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.