Koyna Dam: कोयनेत कमी पाऊस अन् जादा पाणी आवक

मागील वर्षीच्या तुलनेत 650 मिलिमीटर कमी पाऊस; 48 टीएमसी पाण्याचा विनावापर विसर्ग
Koyna Dam |
Koyna Dam: कोयनेत कमी पाऊस अन् जादा पाणी आवकPudhari Photo
Published on
Updated on
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : मागील तीन महिन्यांत कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात 147.84 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 31 मे अखेर धरणात 23.12 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता. तर जूनपासून आजवर पश्चिम वीज निर्मितीसाठी 10.61 टीएमसी, पूर काळातील 8.96 टीएमसी अशा 19.57 टीएमसी पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे. तर 48.01 टीएमसी पाणी विनावापर सोडले आहे. अशा एकूण 67.58 टीएमसी पाण्याच्या विसर्गानंतरही धरणात सध्या 101.13 टीएमसी पाणीसाठा आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत सरासरी 650 मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली असली तरी पाण्याची आवक व पाणी वापर दोन्हीही जादा झाला आहे.

वीज निर्मितीसह सिंचनाची मिटली चिंता...

1 जूनपासून कोयना येथे 4 हजार 232 मिलिमीटर, नवजा येथे 5 हजार 187 मिलिमीटर तर महाबळेश्वरमध्ये 5 हजार 6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सिंचनासाठी अद्याप पाणी वापर झालेला नसला तरी पश्चिम वीज निर्मितीसाठी लवादाचा 67.50 टीएमसी पाणीकोटा आरक्षित असतो. त्यापैकी आतापर्यंत 10.61 टीएमसी पाणी वापर झाल्याने आगामी नऊ महिन्यांसाठी 56.89 टीएमसी पाणी पश्चिम वीज निर्मितीसाठी वापरावे लागणार आहे. त्याचवेळी सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने आता चिंता मिटली आहे.

मुसळधार पावसामुळे पंधरा दिवसांतच धरणात 48.01 टीएमसी पाण्याची आवक

सरासरी 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होते. त्यामुळे महापुराचे संकट निर्माण होते. या वर्षी मात्र नेमकी उलटी परिस्थिती होती. या पहिल्या पंधरवड्यात कोयना धरणात केवळ 7.72 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. तर कोयनानगर 118 मिलिमीटर, नवजा 250 मिलिमीटर व महाबळेश्वर येथे 192 मिलिमीटर इतक्या कमी पावसाची नोंद झाली होती. मागील काही वर्षाचा इतिहास लक्षात घेता हा अत्यल्प पाऊस होता. मात्र दुसर्‍या पंधरवड्यात मात्र मुसळधार पाऊस झाला आणि अवघ्या 15 दिवसात कोयना येथे 1 हजार 95 मिलिमीटर पाऊस झाला. नवजा येथे 1 हजार 618 मिलिमीटर पाऊस झाला असून महाबळेश्वरमध्ये 1 हजार 365 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने तब्बल 48.01 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news