पाटण : सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने कोयना धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी आता पूर्णपणे बंद करण्यात आले असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
कोयना धरणाच्या पूर्वेकडे सिंचनासाठी मागील काही महिन्यांपासून सातत्याने पायथा वीजगृहातील वीस मेगॅवॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे जलविद्युत निर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. मागणी वाढत गेल्याने धरण पायथ्याशी असलेल्या आपत्कालीन तथा विमोचक दरवाजातून सातत्याने सिंचनासाठी पाणी सोडावे लागत होते. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात वादळी पाऊस व कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे.
सांगली पाटबंधारे विभागाकडून होणारी सिंचनाची मागणी कमी झाल्याने पहिल्या टप्प्यात आपत्कालीन दरवाजातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले. शनिवारी पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती करून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणीही बंद करण्यात आले आहे. सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. धरणात एकूण 24.66 टीएमसी उपलब्ध तर 19.54 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

