

पाटण : कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरासह पाटण तालुक्यातही अद्याप दमदार पाऊस पडत आहे. धरणांतर्गत विभागातून सध्या सरासरी 25,324 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. त्याचवेळी धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून 1050 क्यूसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात आलेले पाणी व कोयना नदी क्षेत्रात पडणारा पाऊस यामुळे अनेक ठिकाणी कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने स्थानिक गावे, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
सध्या कोयना धरणात एकूण 35.16 टीएमसी उपलब्ध, तर 30.16 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणातील पाणी उंची समुद्र सपाटीपासून 2086.8 फूट, तर जल पातळी 636.16 मीटर इतकी आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाच ते शनिवार संध्याकाळी पाच या चोवीस तासांत धरणात 2.19 टीएमसी पाण्याची आवक झाली. एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे 792 मिलिमीटर, नवजा येथे 847 मिलिमीटर, तर महाबळेश्वर येथे 783 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.