

कराड : जमीन पसंती देऊन वर्ष उलटून गेले तरी आजतागायत ताबा दिला जात नाही. उलट नवनवीन त्रुटी काढून विनाकारण शासनाकडून वेळ काढू धोरण घेतले जात आहे. यावर उपाय काढून तातडीने जमीन वाटप सुरू केले नाही तर पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांसह इतर जिल्ह्यात विभागलेले कोयना धरणग्रस्त सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एप्रिलच्या मध्यावर बेमुदत आंदोलन सुरू करतील. त्यानंतर जमीन वाटप सुरू झाल्याशिवाय घरी जाणार नाहीत, असा निर्धार धरणग्रस्तांनी केला. कोयनानगर येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला होता.
यावेळी बोलताना डॉ. भारत पाटणकर म्हणाले, कोयना धरणग्रस्तांनी स्वतः लढून 1999 चा कायदा बॅक डेटेड पध्दतीने कोयना धरणाला लढून लावून घेतला, या धरणग्रस्तांवर कुणी उपकार केला नाही किंवा वशील्याने लावला नाही. कोयना धरणग्रस्त गोरगरीब जनतेने लढा करूनच हे ऐतिहासिक यश मिळवले. या धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात जमीन वाटप करताना समोर धरणग्रस्त व्यक्ती, सर्व दप्तरासह तलाठी, सर्कल, तहसीलदार, पुनर्वसन अधिकारी कॅम्प घेऊन व रेकॉर्ड जागेवर काढून जमीन वाटप करत होते. आज शासनाच्या दप्तरातील रेकॉर्ड सापडत नाही किंवा धरणग्रस्तांनाच रेकॉर्ड काढण्यास सांगितले जात आहे. हे पूर्णपणे चुकीचे असून टाळाटाळ करण्याचाच प्रकार आहे. यावेळी संतोष गोटल, श्रीपती माने, किसन सुतार, पी. डी. लाड, दाजी शेलार, महादेव यादव, कृष्णाबाई थोरवडे यांनी मनोगत व्यक्त केली,
याप्रसंगी जयवंत लाड, अशोक माने, सुरेश थोरवडे, साधू सपकाळ, सीताराम सुतार, शिवाजी जाधव, संजय कुंभार, एकनाथ लाड, सखाराम साळुंखे, शंकर सपकाळ, महादेव वाघमारे, गजराबाई खराडे, हिराबाई यादव, पारुबाई जाधव यांच्यासह कोयना धरणग्रस्त उपस्थित होते.