

पाटण : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मंगळवारी सकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले आहेत. त्यातून प्रतिसेकंद 3 हजार 400 क्युसेक तर धरणाच्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2,100 असे एकूण 5,500 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात सध्या 76.52 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 25,478 क्युसेक पाण्याची आवक होत असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 28.73 टीएमसी पाण्याची गरज आहे. दरम्यान, गतवर्षी 15 जुलै रोजी धरणात 34.44 टीएमसी साठा होता. यंदा मे महिन्यापासूनच पाऊस असल्याने तब्बल 42 टीएमसी पाणी अधिक आहे. 1 जूनपासून आत्तापर्यंत कोयनानगर येथे 2350 मि.मी. , नवजा 2235 मि.मी. तर महाबळेश्वर 2318 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. सोमवार संध्याकाळी पाच ते मंगळवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात 2.20 टीएमसीने वाढ झाली आहे.
गतवर्षी 15 जुलैनंतर अचानक पावसाचा जोर वाढला, त्यानंतर 25 जुलैपासून धरणाच्या सहा वक्री दरवाजातून पाणी सोडण्यात आले होते. यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली तो अद्यापही कायम आहे. मागील चार-पाच दिवसांत पावसाचा जोर कमी झाला होता; मात्र सोमवारपासून तो पुन्हा वाढला आहे. यावर्षी 15 जुलैपासूनच धरणातून विनावापर पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.