

कराड : सातारा जिल्ह्याला पर्यटन हब बनविणार आहे. त्यासाठी कोयना दौलत डोंगरी महोत्सवाप्रमाणे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगत डिसेंबरमध्ये कोयना धरण जलाशयात कोयना बॅक वॉटर हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव आयोजित करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
दौलतनगर (मरळी, ता. पाटण) येथील कोयना दौलत डोंगरी महोत्सवात ते बोलत होते. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्ममंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांनी समूह शेतीसह बांबू लागवडीकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी कोयना दौलत महोत्सव वरदान ठरेल, असा विश्वास व्यक्त करत साताऱ्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटन क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहोत. महाबळेश्वर फेस्टिव्हलप्रमाणे कोयना बॅक वॉटर महोत्सव आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्राला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या 15 लाखांहून 37 लाखांवर गेली आहे. तसेच, राज्यातील पर्यटकांची संख्या 11 कोटींहून 18 कोटींपर्यंत गेली आहे. साताऱ्यात 400 ते 500 दुर्मीळ वनौषधी असून मुनावळेत स्कूबा डायव्हिंगसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक पालकमंत्री देसाई यांनी केले.