

पाटण : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने गतवर्षीच्या तुलनेत येेथील जलविद्युत प्रकल्पातून यंदा तब्बल 666 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय मे महिन्यात पश्चिम वीजनिर्मितीसाठी लागणारा आवश्यक पाणीसाठाही धरणात शिल्लक आहे. त्यामुळे वीजनिर्मितीबाबतच्या राज्याच्या सर्व चिंता दूर झाल्या आहेत.
सन 2024 मधील पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात 183.61 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. आतापर्यंत 11 महिन्यांत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 59.35 टीएमसी पाण्यावर 2,710.722 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. येथे गतवर्षी 45.19 टीएमसी पाण्यावर 2,045.998 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. त्यामुळे यंदा 14.16 टीएमसी जादा पाण्याचा वापर करून 664.724 दशलक्ष युनिट अधिक वीजनिर्मिती झाली आहे. चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता, 1 जून 2024 पासून आजवरच्या 11 महिन्यांत एकूण 92.81 टीएमसी पाण्यावर 2,866.141 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली; तर गतवर्षी 80.31 टीएमसी पाण्यावर 2,200.356 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 12.50 टीएमसी पाणी वापर जादा झाला असून, 665.785 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.
कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीत सोडण्यात येते. आतापर्यंत सिंचनासाठी सोडलेल्या 24.36 टीएमसी व पूरकाळातील सोडलेले 9.10 टीएमसी पाणी असे एकूण 33.46 टीएमसी पाण्यावर 155.419 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या 32.60 व पूरकाळातील 2.52 अशा 35.12 टीएमसी पाण्यावर 154.358 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 1.66 टीएमसी पाणी वापर कमी झाला असला, तरी 1.061 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.