

पाटण : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणार्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे सर्व सहा वक्री दरवाजे मंगळवार, 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता उघडले जाणार आहेत. दरवाजे एक फूट सहा इंचांनी उचलले जाणार असून, कोयना नदीत प्रतिसेकंद 5 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील कृष्णा व कोयना नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
यावर्षी मे महिन्यापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात दरवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा झाला आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणात 74.59 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. त्याचवेळी धरणात प्रतिसेकंद 12 हजार 389 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरण 70.87 टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमीच आहे. मात्र, असे असले तरी धरणाच्या शिवसागर जलाशयातील सद्यस्थितीतील पाणीसाठा, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस, धरणात होणारी पाण्याची आवक आणि उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेत पाणीसाठा नियंत्रित करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी 11 नंतर कोयना नदीत प्रतिसेकंद 7 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याने कोयना नदीसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळेच सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुक्यांतील, तसेच सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.