

कोरेगाव : कोरेगाव मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील गावांमध्ये गेल्या पाच वर्षांत प्रभावी उपाययोजना करण्यात आल्याने पाणी टंचाईची झळ कमी बसू लागली आहे. येणार्या काळात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून पाणीटंचाई हा शब्द कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ शेतकर्यांनी एकत्रित यावे. एकोप्याने आपण पाणीटंचाईवर मात करूया, असा विश्वास आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला.
कोरेगावमधील गजरा मंगल कार्यालयात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, माजी जि.प. सदस्य किशोर बाचल, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, संतोष जाधव, निलेश यादव, संजय काटकर, रमेश उबाळे, श्रीमंतदादा झांजुर्णे, विजयराव घोरपडे, बिचुकलेचे सरपंच प्रशांत पवार, प्रांताधिकारी अभिजीत नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
आ. महेश शिंदे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी कोरेगाव तालुक्यात पाणीटंचाई भासत होती. भाडळे भागात डोंगराच्या पायथ्याला असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई भीषण होती. मात्र जलसंधारणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले. गावोगावी पाणी योजना मार्गी लावल्या, त्याचबरोबर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्याला हक्काचे दोन टीएमसी पाणी मिळवून दिले. पावसाळ्यामध्ये भाडळेसह अन्य तलाव भरून घेतले. त्यामुळे सद्यस्थितीत पाणीटंचाईची झळ बसत नाही. फार थोड्या प्रमाणात यावर्षी टंचाईचे सावट आहे.
जलजीवन योजना, राष्ट्रीय पेयजल योजना यासह विविध योजनांच्या माध्यमातून गावोगावी आणि वाडीवस्तीवर पाणी योजना राबवल्या जातील. जिथे जिथे टंचाई भासत आहे, तेथे तेथे मार्ग काढला जाईल. सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्याबाबत पुढाकार घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करावेत, ते तातडीने मंजूर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांनी पाणी टंचाई काळात तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे त्यांनी प्रस्ताव सादर करावे त्यांना लवकरात लवकर मान्यता दिली जाईल, असा शब्द त्यांनी दिला. राहुल होनराव यांनी प्रास्ताविक केले.
आ. महेश शिंदे पुढे म्हणाले, कोरेगाव तालुक्यात ज्या गावच्या पाणीपुरवठा योजना सिंगल फेज विद्युत प्रवाहावर नाहीत, त्यांनी महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून कागदोपत्री पूर्तता करून घ्यावी. पाणीपुरवठा योजनांना अहोरात्र वीज उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न आहे तसे झाल्यास कोठेही पाणीटंचाई भासणार नाही, असेही ते म्हणाले.