

कोरेगाव : कोरेगाव तालुक्याच्या हक्काचे पाणी कोरेगाव तालुक्याला मिळवून देणार आहे, त्यासाठी वाटेल ती राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल. मात्र सर्वसामान्य शेतकर्यांना दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग दुष्काळमुक्त करून 98 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी कृष्णा नदीवर वनगळ उपसा सिंचन योजना राबविण्यात येणार आहे. सुमारे अकराशे कोटी रुपयांची योजना येत्या दोन वर्षात कार्यान्वित करून बावीसशे हॉर्स पॉवरच्या पंपाच्या साह्याने बारामाही पाणी अरबवाडी तलावात आणण्यात येईल, अशी घोषणा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी केली.
बनवडी येथील अरबवाडी तलावामध्ये वसना उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी आणण्यात आले आहे. शनिवारी ना. महेश शिंदे यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, उपविभागीय अभियंता शिवाजी पवार, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव, विद्यमान अध्यक्ष निलेश यादव, अॅड. संजय सकुंडे, तानाजीराव गोळे, संदीप भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काटकर, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत पवार, बबनराव भिलारे, पोपटराव दिघे, बाबा नलगे, सरपंच ज्योती सुधीर कोरडे, शामराव कदम, चित्रा चाफेकर, नंदराज मोरे, शक्ती शिंदे उपस्थित होते.
ना. महेश शिंदे म्हणाले, आजवर सातारा जिल्ह्याचे हक्काचे पाणी शेजारच्या जिल्ह्यांनी पळवून नेले, त्यावेळी लोकप्रतिनिधी असणारे शांत बसले होते. त्यांना संधी असून देखील त्यांनी कधीही आपल्या भागातील सर्वसामान्य शेतकर्यांना पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न केले नाहीत. केवळ दिखावा केला आणि राजकारण केले. राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून राजकारण या पलीकडे त्यांनी काही केले नाही. मात्र बनवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सामान्य शेतकर्यांनी सामान्य शिक्षकाच्या पोराला आमदार केल्यानंतर शंभर टक्के या भागातला पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला होता, त्याप्रमाणे आज पाणी योजना कार्यान्वित झाली आहे.
तुम्हाला ही योजना पूर्ण झाल्याचे समाधान वाटत असेल, मला मात्र मनापासून समाधान वाटत नाही. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग पूर्णपणे सिंचनाखाली जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत माझ्या मनाला समाधान वाटणार नाही. त्यासाठी अरबवाडी तलावापासून अवघ्या आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या वनगळ येथे कृष्णा नदीवर जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर मोठा बंधारा बांधून बावीसशे हॉर्स पॉवरच्या मोटरच्या साह्याने पाणी उचलून अरबवाडी तलावात आणण्यात येईल आणि तिथून उत्तर भागातील प्रत्येक गावाला पाणी दिले जाईल. सध्या वर्षातून तीन वेळा अरबवाडी तलाव पाण्याने भरला जाणार आहे, भविष्यात वनगळ योजना कार्यान्वित झाल्यानंतर हा तलाव बारमाही भरला जाईल आणि त्याद्वारे उत्तर भागातील वाडी वस्तीला कॅनॉलद्वारे पाणी दिले जाईल, असा शब्द ना. महेश शिंदे यांनी दिला.
ना. शिंदे पुढे म्हणाले, कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील जनतेला भूलथापा देऊन गंडा घालण्याचे काम यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केले. केवळ नारळ फोडून जनतेची दिशाभूल करणार्या या नेतृत्वाला येथील जनतेने नारळ देऊन कायमस्वरूपी घरी बसवण्याचं काम केले.
विधानसभेचे माजी सभापती आमदार शंकरराव जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत बनवडी येथे मंदिरात झालेल्या बैठकीत विरोधकांना पाणी प्रश्न सोडविण्याचे आवाहन करुन त्यांना निवडणुकीत मदत केली, मात्र विरोधकांनी भूलथापा मारून वेळ मारून नेली. शंकरराव अण्णांचा विश्वासघात केल्याने त्यांचा तळतळाट विरोधकांना लागला असून त्यामुळे त्यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे, ती आता थांबत नाही, अशी टीका आ. महेश शिंदे यांनी केली.
यावेळी बिचुकले येथील सरपंच प्रशांत पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पवार, पळशीचे माजी सरपंच सुरेश आफळे, वैभव सकुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व सूत्रसंचलन प्रकाश राजे यांनी केले. प्रास्तविक मनोज गाढवे यांनी केले. याप्रसंगी बाळकृष्ण नलगे, जगन्नाथ गोळे, दत्तात्रय जाधव, अरुण नलगे, सूर्यकांत नलगे, तुकाराम नलगे, गोविंद नलगे, सुभाष नलगे, किरण गोळे, अजित गोळे, अरविंद कोरडे, प्रवीण कदम, नितीन सावंत, तानाजी सकुंडे, भरत आवाडे, श्रीधर कदम, सुभाष कदम उपस्थित होते.
पिंपोडे खुर्द येथील दोस्ती ढाबा ते कोरेगाव यादरम्यान खंडाळा शिरोळ राज्यमार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. ज्यावेळी या कामाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी विरोधकांनी चेष्टेचा विषय बनवला आणि एक आमदार चारशे कोटीचा निधी आणू शकतो का? असा सवाल उपस्थित केला होता. आज प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. जनता उघड्या डोळ्यांनी ते पाहत आहे. यापुढे पिंपोडे खुर्द ते सातारा असा एक्सप्रेस वे बांधण्यात येत असून पिंपोडे खुर्द येथील पुलाचे काम देखील मार्गी लावणार असल्याचा शब्द आ. महेश शिंदे यांनी दिला.