Kisan Veer College Research patent: किसन वीर महाविद्यालयाच्या संशोधनास भारत सरकारचे पेटंट
सातारा : वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, संशोधन व विकास कक्षाचे संचालक डॉ. संदीप वाटेगावकर, प्रा. पूजा जायगुडे व प्रा. अजित पांढरे यांनी विकसित केलेल्या ॲझो डाय निर्मिती व जिवाणूरोधक क्रियाशीलता तपासणीच्या नावीन्यपूर्ण व कार्यक्षम उपकरण पद्धतीला भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे.
प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे म्हणाले, आज जगभर वाढत असलेल्या जिवाणूरोधक प्रतिकारशक्ती समस्येच्या पार्श्वभूमीवर हे उपकरण खूप उपयोगी ठरेल. वैज्ञानिक संशोधनाची नक्कीच गती वाढवेल व वैद्यकीय, औषधनिर्मिती तसेच पर्यावरण क्षेत्रातही उपयुक्त ठरेल. या उपकरणाच्या मदतीने सद्याच्या प्रतिजैविकांना पर्याय ठरु शकणारी नवीन आणि प्रभावी संयुगे शोधता येतील.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या या संशोधन अभिमान आहे. या पेटंटमुळे महाविद्यालयाला राष्ट्रीय बहुमान मिळाला असून रसायनशास्त्र विभाग हा नेहमीच विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी संशोधन करावे यासाठी प्रयत्नशील आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायणराव चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, प्रा. डॉ. विनोद वीर, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले.

