

कोरेगाव : किन्हई, ता. कोरेगाव येथील ‘अकराचा तलाव’ परिसरातील शेतशिवारात वांगणा उपसा जलसिंचन योजनेची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ऐन उन्हाळ्यात ही घटना घडल्याने पाईपलाईनच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पाच दिवसांपूर्वी फुटलेली पाईपलाईन अद्याप दुरुस्त न केल्याने लाभधारक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तत्काळ दुरुस्ती न केल्यास लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशार स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व नूतन जिल्हा परिषद सदस्य हणमंत जगदाळे यांनी दिला आहे. यावेळी डॉ. सुनील भोसले, चेअरमन गजानन भोसले, प्रशांत काटे, प्रदीप चिकटे, विक्रम बोडके यांच्यासह मोठ्या संख्येने लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भाडळे व किन्हई खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने 2010 साली धोम धरण कॅनॉलवर खेड नांदगिरी येथे पंपगृह उभारून दोन फूट व्यासाच्या पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. मात्र या योजनेत ठेकेदाराने शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचा वापर न करता कमी गेजच्या व हलक्या प्रतीच्या पाईपलाईनचा वापर केल्याचा आरोप होत असल्याने ही योजना सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. प्रेशर ॲडजेस्टमेंट व्यवस्थित न झाल्याने अनेकदा पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडल्या असून प्रत्येक वेळी लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या योजनेतून 100 हून अधिक लाभधारक शेतकऱ्यांच्या सुमारे 230 एकर क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो.
मात्र पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने रोटेशननुसार मिळणारे पाणी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार संबंधितांनी केली आहे. दरम्यान, या योजनेचे दरमहा सुमारे 70 हजार ते 1 लाख रुपये वीजबिल येते. त्यापैकी 81 टक्के हिस्सा शासन तर 19 टक्के हिस्सा लाभधारक शेतकरी भरतात. प्रत्येक शेतकऱ्याला साधारण किमान 10 हजार रुपयांचा भरणा करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले. पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा लाभधारकांनी दिला आहे.