

कराड : कोडगू (कर्नाटक) येथे दुर्मिळ किंग कोब्राला बंदिस्त ठेवून त्याच्यासोबत फोटोशूट करून पैसे कमावणार्या रॅकेटचा कर्नाटक वनविभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील दोन तसेच कोडगुतील दोन अशा चौघांवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातार्यातील दोन तरुणांनी सोशल मीडियावर टाकलेल्या दोन किंग कोब्रासोबतच्या पोस्टवरून वन विभागाने केलेल्या तपासात चौघांनी दुर्मिळ साप फोटो व व्हिडिओसाठी वापरल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून किंग कोब्रा हाताळला जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. महाराष्ट्रातील दोघांना कोडगू येथे ताब्यात घेण्यासाठी शेजारील राज्याची मदत मागवली आहे. सापांना पकडणे, बंदिवासात ठेवणे व प्रदर्शनासाठी वापरणे हा वन्यजीव कायद्याचा भंग असून त्यासाठी तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.
किंग कोब्रा हा महाराष्ट्रात केवळ सावंतवाडी-दोडामार्ग परिसरात आढळतो. तरी सातार्यातील काही तरुणांकडे इंटरनेटवर याचे सर्वाधिक फोटो असल्याचा आरोप वन्यजीव कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे वनविभागाने अधिक सतर्क राहून सायबर सेलच्या मदतीने चौकशी वाढवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
लाईक्ससाठी सापांचा छळ
सोशल मीडियावरील लाईक्स व प्रसिद्धीसाठी दुर्मिळ सापांचा छळ होतो. त्यामुळे हे थांबवणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन मानद वन्यजीव वॉर्डन रोहन भाटे (सातारा) यांनी केले आहे.