

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ मंत्र्यांच्या आदेशाने पोलिसांनी आमचे अपहरण केले होते. आमचा एन्काउंटर होणार होता; परंतु आम्ही या कटातून वाचलो आहोत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हेच या कटाचे खरे सूत्रधार आहेत, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी पत्रकार परिषदेत केला. अजूनही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात, जीवितास धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी दि. 20 मार्च रोजी जि. प.त सदस्यांची मतदान प्रक्रिये दिवशी देसाई आणि मांडवे यांना जि. प.तून उचलून नेले होते. याबाबत माहिती देताना देसाई म्हणाले, 20 मार्च हा इतिहासातील काळा दिवस ठरला. सदस्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार मला असल्याने राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या बैठकीमध्ये मी सदस्यांना व्हिप दिला. सदस्य मांडवे तसेच ज्यांच्या अपहरणाचा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल झाला ते बापूसाहेब शिंदेही सोबत होते. जि. प.च्या चौथ्या मजल्यावर मतदान करण्यासाठी आम्ही गेलो, तिथे साध्या वेशातील 25 ते 30 पोलिसांनी मला व मांडवे यांना पकडून फरफटत नेले.
यानंतर जि.प.च्या मागील दरवाजाने गाडीत घालून आम्हाला मेढ्याच्या दिशेने निर्जनस्थळी नेले. त्याचवेळी गर्जे नावाच्या पोलिसाला कुठल्यातरी बॉसचा फोन आला. मोहीम फत्ते झाल्याचे त्यांचे फोनवर संभाषण झाले. त्यानंतर ही गाडी पुन्हा माघारी वळवली. वाटेत पुन्हा फोन आला, महाबळेश्वरला घेऊन जा. म्हणून पुढून आदेश आल्यानंतर पाचगणी मार्गे महाबळेश्वरला नेण्यात येणार होते. तेव्हाच आमचा एन्काऊंटर केला जाणार, अशी शंका आली होती.