Khed Gram Panchayat Scam | खेड ग्रा. पं. मध्ये पावणेसतरा लाखांचा अपहार

सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकार्‍यांकडून वसुली करण्याचे आदेश
Khed Gram Panchayat scam |
खेड ग्रा. पं. मध्ये पावणेसतरा लाखांचा अपहार File Photo
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्यात मोठी असणार्‍या खेड ग्रामपंचायतीमध्ये 16 लाख 19 हजार 143 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते साहिल अकबर शेख यांनी हा अपहार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतर अपहाराची जबाबदारी सरपंच लता फरांदे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. या दोघांकडून या अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिले आहेत. यामुळे सातारा तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता साहिल शेख यांनी खेड ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांत अपहार झाल्याची तक्रार गटविकास अधिकार्‍यांकडे केली होती. दाखल झालेल्या तक्रारीवर गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या चौकशीअंती खेड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले.

विकासकामांच्या निविदा न करणे, कामांचे अंदाजपत्रक व तांत्रिक मंजुरी नसणे व कामांची मोजमापे पुस्तकांमध्ये नसताना देखील मक्तेदारास बिल अदा करणे अशी अनेक प्रकारची अनिमियतता झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सरपंच लता फरांदे यांच्याकडून 8 लाख 39 हजार 572 रुपये व ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव यांच्याकडून 8 लाख 39 हजार 572 रुपये असे मिळून 16 लाख 79 हजार 143 रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले.

या कामांमध्ये वनवासवाडी वॉर्ड, विकास नगर वॉर्ड, खेड वॉर्ड व प्रतापसिंहनगर वार्ड या भागातील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार व अनियमितता आढळून आली आहे. सातार्‍यालगतच्या उपनगरांपैकी खेड ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. येथेच भ्रष्टाचार झाल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही ग्रामपंचायत आ. महेश शिंदे गटाच्या ताब्यात आहे आता आ. महेश शिंदे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

आ. महेश शिंदे सरपंचांचा राजीनामा घेणार का? : यादव

खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी आ. महेश शिंदेंनी भ्रष्टाचारमुक्त चेहरा देणार, असे सांगितले होते. परंतु, आता चेहरा भ्रष्टाचारयुक्त निघाला आहे. त्यामुळे नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून आ. महेश शिंदे हे सरपंच सौ. लता फरांदे यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news