

अविनाश कदम
खटाव : आ. महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे आणि माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचे जावई राहुल पाटील यांच्यामध्ये खटाव झेडपी गटात होत असलेली लढत जिल्ह्यात हेवीवेट ठरणार आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी सर्वार्थाने तोडीस तोड असल्याने राजकारणातील डाव प्रतिडाव टीपेला पोहचले आहेत. पारावरच्या चर्चांमध्ये खटाव गटातील लढतीला मिनी विधानसभा लढत, असे संबोधले जात आहे. तसा प्रचाराचा जोरदार धुरळाही उडाला आहे.
खटाव गटातून सर्वात अगोदर डॉ. प्रिया शिंदेंची उमेदवारी निश्चित होवून त्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली. वास्तविक पाहता आ. महेश शिंदे आणि राहुल पाटील गेली अनेक वर्षे एकत्र काम करत होते. पाटील आमदारांचे राईट हँड म्हणूनच वावरत होते. आमदार पाटलांनाच झेडपीला संधी देणार असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्तही करत होते. मात्र डॉ. प्रिया शिंदेंच्या प्रचाराच्या फेऱ्या दोन महिन्यांपूर्वी सुरु झाल्यावर पाटलांच्या गोटात चलबिचल झाली. काही दिवसांपूर्वी जाहीर कार्यक्रमात राहुल पाटलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत थेट आ. महेश शिंदेंवर तोफ डागली. आमदारांसाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे हक्काचे फळ मिळण्याची वेळ आल्यावर विनाकारण खोटे आरोप करुन डावलण्यात आल्याचे सांगून पाटलांनी निवडणुकीत दंड थोपटले.
खटावचे मुरब्बी राजकारणी राष्ट्रवादीचे नेते प्रदीप विधाते यांच्या गटाबरोबर पाटलांच्या गटाची सोयरीक जुळावी, अशी वातावरण निर्मिती झाली. मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि विधातेंच्या मंथनातून राहुल पाटील आणि विधाते आण्णांचे गट एकत्र आले. त्या अगोदर विधाते आणि आ. महेश शिंदे यांचे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या. आता डॉ. प्रिया शिंदे भाजपकडून आणि राहुल पाटील राष्ट्रवादीकडून खटाव गटातून निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांबरोबर प्रदीप विधातेंचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राहुल पाटलांना आजोबा माजी आमदार कै. चंद्रहार पाटील, माजी आमदार कै. केशवराव पाटील यांचा वारसा आहे. सासरे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचे भक्कम पाठबळ आहे. दुसरीकडे आ. महेश शिंदेंचे राजकीय कसब गेल्या सात-आठ वर्षात संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायत निवडणुका तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये महेश शिंदेंनी विरोधकांना अनेक वेळा धोबी पछाड दिला आहे. निवडणुकांचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. नेमका कोणत्या गावात, कोणत्या भागात हात घालायचा हे कसब त्यांनी चांगलेच अवगत केले आहे. गेल्या सहा वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी खटाव गटात रणशिंग फुंकले आहे. पत्नीचीच उमेदवारी असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी सर्वाधिक प्रतिष्ठेची झाली आहे. दुसरीकडे राहुल पाटील आणि प्रदीप विधातेंनी एकत्र येत आमदारांना आव्हान दिले आहे.
दोन्ही बाजू सर्वार्थाने तुल्यबळ असल्याने प्रचाराचा जोरदार धुरळाही उडायला लागला आहे. रात्रीच्या रात्री जागू लागल्या आहेत. लवकरच जाहीर सभांद्वारे एकमेकांविरोधात फैरी झाडण्याची तयारी सुरु झाली आहे. घराणेशाही, जातीचे कार्ड, विश्वासघात, शब्द फिरवणे, विकासकामे, रोजगार उपलब्ध करणे, मनभेद, बुध्दीभेदाचे राजकारण असे अनेक फंडे वापरायला सुरुवात झाल्याने खटाव गटाची निवडणूक उत्कंठा वाढवणारी ठरणार आहे.