Mahesh Shinde | खटावच्या शिवारात पाणी आणण्याचे स्वप्न पूर्ण : आ. महेश शिंदे

नेर उपसा सिंचन योजनेचे जलपूजन व भूमिपूजन संपन्न
Mahesh Shinde | खटावच्या शिवारात पाणी आणण्याचे स्वप्न पूर्ण : आ. महेश शिंदे
Published on
Updated on

खटाव : गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टच्या माध्यमातून जिहे-कठापूर जलसिंचन योजनेला गती मिळाली आणि ती पूर्ण झाली. या उपसा सिंचन योजनेचा पहिला व दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे खटाव उत्तर भागातील शिवारात पाणी पोहोचले आहे. त्यामुळे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. दिलेला शब्द पूर्ण केला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ शंभर टक्के सिंचनाखाली आणण्याचा मानस आहे. महायुती सरकारने कायम न्याय दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन आ. महेश शिंदे यांनी केले.

फडतरवाडी, ता. खटाव येथे गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर) अंतर्गत नेर उपसा योजना टप्पा क्रमांक 1 व 2 चे जलपूजन आणि टप्पा क्रमांक 3 व 4 चे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपसभापती लवकुमार मदने, भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी शेडगे, माजी पं. स. सदस्य मधुकर पाटोळे, डॉ. प्रिया शिंदे, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, रणधीर जाधव, जी. डी. खुस्पे, पोपटराव भराडे, बाळासाहेब जाधव, शंकर कदम, तानाजी फाळके, सरपंच चारुशीला इंजे, उपसरपंच नवनाथ खुस्पे, उपसरपंच अभयराजे घाडगे, उपसरपंच महेश नलवडे, सरपंच सुजाता बोराटे, माजी सरपंच संगीता शिंदे, दीपाली मुळे, प्रभावती भराडे, राहुल देशमुख, हरिश्चंद्र सावंत, नवनाथ वलेकर, गणपतराव शिंदे, राजनंदिनी पाटील उपस्थित होते.

आ. महेश शिंदे म्हणाले, जिहे-कठापूर योजनेला कै. लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव दिले. केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेतली. प्रचंड अडचणीतून मार्ग काढत कृष्णा खोरे योजनेचे फेर नियोजन केले. वंचित गावांना पाणी देण्याची भूमिका होती. त्यासाठी जन आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाने दखल घेतली. मग शासनाने पाणी देण्याचा जी आर काढला. खटावचे नशीब पालटण्याचे काम महायुतीने केले आहे. या योजनेचा टप्पा 1 आणि 2 पूर्ण झाला आहे. त्यामुळे खटाव उत्तर भागातील शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी आले आहे. 3 व 4 टप्प्यात बुधावलेवाडी, जांब, बिटलेवाडी तलावात पाणी जाणार आहे. त्याचा लाभ रेवलकरवाडी, कोकराळे, जाखणगाव, लोणी गावांना होणार आहे.

याच टप्प्यात मोळ, मांजरवाडी, डिस्कळ, गारवडी, राजापूर भाग सिंचनासाठी येणार आहे. येणाऱ्या एक वर्षात ही योजना मार्गी लागणार आहे. 5 व 6 व्या टप्प्यात रामोशीवाडी, भाडळे, बिचुकलेवाडी, तलाव भरणार आहे. 7 व्या टप्प्यात देगाव, वर्णे भाग येणार आहे. सगळी कामे मंजूर आहेत. ती लवकरच सुरु करणार आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ शंभर टक्के सिंचनाखाली आणण्याचा मानस आहे. महायुती सरकारने कायम न्याय दिला आहे. आज खटाव उत्तर भागात पाणी पोहचले असून एक स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.

यावेळी भरत मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब सावंत, सुसेन जाधव, सचिन चव्हाण, राजेंद्र भगत, शशिकांत रोमन, कॅ. बबनराव धुमाळ, आण्णा वलेकर, दिपक विधाते, श्रीकांत खुस्पे, साहेबराव खुस्पे, विजय शिंदे, सुनिल माने, नवनाथ साळुंखे, विजय मोहिते, सत्यवान साळुंखे, हणमंत शिंदे, मंदार माळी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, शेतकरी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. प्रास्तविक उपसरपंच अभयराजे घाटगे यांनी केले. सूत्रसंचलन चंद्रकांत कोकाटे यांनी केले.

जल अन्‌‍ भूमीपूजनास दिव्यांगांसह खटावकरांची प्रचंड गर्दी...

फडतरवाडीच्या टेकडीवरच्या माळरानावर पाणी आलं अन्‌‍ खटावकरांनी एकच जल्लोष केला. हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी झाली. दुष्काळाचा शिक्का माथी असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. प्रचंड उत्साहात झालेल्या जल व भूमिपूजन सोहळ्यात दिव्यांग आपल्या अपंगत्वावर मात करत सहभागी झाले होते. एक पाय नसतानाही वॉकरचा आधार घेत सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी विक्रम दगड-माती तुडवत धुरळ्यातून चालत आला होता. पाणी आल्यामुळे आपली पुढची पिढी स्वतःच्या पायावर निश्चितपणे उभी राहील हा विश्वास त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी तमाम दुष्काळी जनतेचे पाण्याचे स्वप्न पूर्ण करणारे जलनायक, अध्यात्मात रमणारे, प्रबळ इच्छाशक्ती असणारे आ. महेश शिंदे यांनी सत्यात उतरवलेले पाणीदार स्वप्नाचे साक्षीदार होण्यासाठी दिव्यांगासह शेतकरी, खटावकरांनी प्रचंड गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news