

खटाव : सैन्य दलात भरती करतो म्हणून एनकूळ ( ता. खटाव ) येथील मुकेश वामन तुपे यांची कराड येथील प्रदीप विठ्ठल काळे याने एक लाख 84 हजारांची फसवणूक केल्याची तक्रार वडूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. जवानाने खटाव तालुक्यातील एकाला गंडा घातल्याचे समोर आले आहे.
वडूज पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश तुपे यांची कराड येथील प्रदीप काळे याच्याशी ओळख झाली होती. 8 फेब्रुवारी 2023 रोजी काळे याने मी भारतीय सैन्यदलात क्लर्क असून तुमच्या नातेवाईकांना भरती करतो असे तुपे यांना सांगितले. एका मुलाला भरती करण्यासाठी तीन लाख रुपये घेतो असेही काळे याने सांगितले. तुपे यांना वारंवार फोन करुन काळे याने नातेवाईकांना सैन्यदलात भरती करण्याबाबत गळ घातली.
वडूज येथे भेट घेऊन काळे याने भरती झाल्यावर आठव्या वेतन आयोगानुसार 80 हजार पगाराप्रमाणे सहा महिन्यात तुमचे पैसे फिटून जातील असे सांगितले. तुपे यांनी ओळखीच्या चार मुलांची कागदपत्रे काळेला पाठवली असता त्याने त्या मुलांना भरती करण्यासाठी सुरुवातीला 40 हजार रुपये घेतले. मुलांना भरती करण्यासाठी सहा महिने लागतील असे सांगून काळेने तुपे यांच्याकडून वारंवार पैसे घेतले. मार्च 2025 ते जून 2025 या कालावधीत तुपे यांनी स्वतःच्या मोबाईलवरुन काळे याला एक लाख 84 हजार रुपये पाठवले.
काही कालावधीनंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तुपे यांनी पैसे मागताच काळेने उडवाउडवीची उत्तरे दिली. तुपे यांनी वडूज पोलिस ठाण्यात काळे याच्या विरोधात एक लाख 84 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पो. नि . घनश्याम सोनवणे करत आहेत.