

खटाव : मान्सूनने दडी मारल्याने अवर्षणप्रवण पट्ट्यातील खटाव तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. उन्हाच्या तीव्र चटक्याने सोयाबीन, राजमा, कडधान्यांसह ऊस आणि बागायती पिके वाळून गेली असून, शेतकरी होरपळला आहे. वैतागलेल्या संदेश शिंदे या शेतकऱ्याने तर सुमारे दोन एकरांवरील सोयाबिन पिकावर रोटावेटर फिरवला. अशीच मानसिकता तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली असून, त्याचे अर्थकारण कोलमडून पडले आहे.
सप्टेंबरच्या उत्तरार्धातही वरुणराजा बरसला नसल्याने संयम संपलेल्या शेतकऱ्यांनी जीवावर दगड ठेवून खरिपाच्या पिकांवर रोटावेटर फिरवायला सुरुवात केली आहे. नगदी पिकांचा खरीप हातातून गेला आहे. गेल्या दीड महिन्यापासून अवर्षणप्रवण खटाव तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. त्या अगोदरही अगदी जेमतेम पाऊस झाला होता. खरिपाच्या पिकांच्या ऐन वाढीच्या आणि कडधान्ये, वाटाणे, सोयाबीन, राजमा पिकांच्या शेंगा भरण्याच्या कालावधीत पावसाची गरज असताना निसर्गाने दगा दिला आहे.
कसलाच पाऊस न पडल्याने आणि उन्हाचा चटका वाढल्याने खरिपाची पिके वाळून गेली आहेत. सप्टेंबरच्या उत्तरार्धातही पाऊस पडण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने बळीराजाचा संयम सुटला असून सोयाबीनसह इतर पिकांवर रोटावेटर फिरवायला सुरुवात केली आहे. जपलेली पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे.
पावासाच्या पाण्याच्या नव्हे, घामाच्या धारा !
गेल्या वर्षी खटाव तालुक्यात सप्टेंबरमध्येही जोरदार पाऊस झाला होता. अगदी मे महिन्यापासून अतिवृष्टीसदृश पावसाने थैमान घातले होते. धरणे, ओढे, नदी, नाले, तलाव तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाले होते. यंदा मात्र स्थिती पूर्णपणे उलट आहे. पाऊस अजिबातच पडला नाही. गेल्या १५ दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. पावसाच्या पाण्याच्या धारांऐवजी घमाच्या धारांनी चिंब होण्याची परिस्थिती ओढवली आहे.