

कराड : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळणे हा त्यांचा हक्कच आहे. याबाबत 4 मे पर्यंत निर्णय घ्यावा. याकामी राज्य शासनाने आवश्यक ते सहकार्य करावे, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले असल्याची माहिती स्व. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी दिली आहे.
1952 मधील हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये गोळेश्वर (कराड)चे सुपुत्र स्व. पै. खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. 14 ऑगस्ट 1984 ला खाशाबा जाधव यांचे अपघातात निधन झाले. मात्र ते जिवंत असताना केंद्र सरकारकडून त्यांची कायम उपेक्षाच झाली आणि आजही रणजित जाधव यांच्यासह त्यांचे कुटुंबीय स्व. खाशाबांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष करत आहेत.
सन 2001 साली स्व. खाशाबा यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर रणजित जाधव यांच्यासह कुटुंबीयांनी स्व. खाशाबांना पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. आज या पाठपुराव्याला 25 वर्षे पूर्ण झाली. 2021 पासून तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही मागणी केंद्र सरकारपुढे मांडली होती.
मात्र आजवर यश मिळाले नाही. त्यामुळेच नोव्हेंबर 2025 मध्ये कुस्तीवीर खाशाबा जाधव फौंडेशनने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन ॲड. संग्राम देसाई यांनी स्व. खाशाबांना पद्मविभूषण मिळणे हा त्यांचा हक्कच असल्याची बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायमूर्तीनी केंद्र सरकारला 4 मे पर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे रणजित जाधव यांनी सांगितले आहे.