

खंडाळा : पुणे-बंगळूर महामार्गावरील खांबाटकी घाटात असणार्या श्री नाथ मंदिराजवळील वळणावर ओव्हरलोड झालेल्या टँकरमधून तेलाची गळती झाली. त्यामुळे सगळे तेल रस्त्यावर पसरल्याने वाहनांची घसराघसरी होऊन संपूर्ण घाट ब्लॉक झाला. प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालक, प्रवासी वैतागले. तब्बल चार तास वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला. खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत तेल सांडलेल्या रस्त्यावर माती टाकून कशीबशी वाहतूक सुरू केली. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाने या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी चारच्या सुमारास तेल घेऊन जाणारा टँकर (क्रमांक एमएच 04 एचएस 6844) हा खांबाटकी घाटातील श्री नाथ मंदिराजवळील वळणावर आला. या वळणावर मोठा चढ असल्याने टँकरमधील ऑइल झाकणातून सांडू लागले. त्यामुळे तो टँकरही रस्त्यावरून घसरू लागला. चालकाने तिथेच टँकर थांबवल्यामुळे टँकरमधील बरेचसे तेल रस्त्यावर वाहू लागले. तेल रस्त्यावर पसरल्याने वाहनांचे टायर घसरू लागले. अनेक दुचाकीस्वार निसरड्या रस्त्यामुळे घसरून पडले. या घटनेची माहिती कळताच खंडाळा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काही काळ वाहतूक थांबवली. अपघातग्रस्त टँकर बाजूला काढून रस्त्यावरील ऑईलवर माती टाकत एक लेन वाहतुकीसाठी सुरू केली.
तेल सांडल्याने रस्ता निसरडा झाला. वाहने बाजूने सावकाश चालवा. दुचाकीवर एकट्याने सावकाश जा, अशा प्रत्येक वाहनचालकास पोलिस सूचना देत होते. मात्र काही दुचाकी व चारचाकी वाहनचालक मनमानी करत सूचना न पाळता वाहने विचित्र पद्धतीने चालवत होते. त्यामुळे वाहने घसरत होती. इतर वाहनांची अडचण होत होती. सुमारे 15 ते 20 दुचाकीस्वार या निसरड्या रस्त्यावर घसरून पडले. मोठी अवजड वाहने घसरून मागे येत असल्याने वाहतूक थांबवावी लागत होती. खंडाळा पोलीस, महामार्ग पोलीस चार ते पाच तास वाहतुक सुरळीत करण्याचा अटोकाट प्रयत्न करत होते. तब्बल चार तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यानंतरही रात्री उशीरापर्यंत वाहनांना घाट ओलांडण्यासाठी बराच वेळ लागत होता. त्यामुळे वाहन चालक, प्रवासी त्रस्त झाले.
महामार्ग पोलीस सपोनि व्ही.सी. वंजारे, फौजदार बाजीराव वाघमोडे, सहाय्यक फौजदार अविनाश डेरे, के.जे. नलवडे, पोलीस हवालदार व्ही. जी. कदम, हेमंत ननावरे, शफीक शेख, खंडाळा पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, फौजदार संतोष म्हस्के, प्रकाश फरांदे आदीनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले. रात्री पावणेआठ वाजता मातीचा डंपर व अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर रस्त्यावर माती टाकून निसरडा रस्ता धुवून घेतला व रात्री साडेआठच्या सुमारास वाहतूक पुर्ववत सुरू झाली.
खांबाटकी घाटात चार किलोमीटर रांगा
टँकरमधील तेल गळतीमुळे खांबाटकी घाट व बोगदा ते वेळे या ठिकाणी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या. खांबाटकी घाट एकूण आठ किलोमीटर अंतराचा आहे. ज्या ठिकाणी तेलगळती झाली त्या ठिकाणपासून खंडाळा बाजूकडे सुमारे चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची प्रचंड रांग लागली. त्याच वेळी दुसरीकडे महामार्गावर वेळे येथे बोगद्यात प्रचंड कोंडी झाली. पुण्याच्या बाजूकडून सातारच्या दिशेने निघालेली वाहने खांबाटकी घाटाऐवजी बोगद्याच्या दिशेने घुसली. त्यामुळे बोगद्यात जाणारी वाहने व उलट्या दिशेने आलेली वाहने अशी कोंडी झाली. वेळे गावापर्यंत सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या प्रकाराने वाहन चालक व प्रवासी वैतागून गेले.
बोगद्यात उलट दिशेने वाहने घुसल्याने कोंडी
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मार्गावर वाहनांची गर्दी होती. दुपारी चारच्या सुमारास खांबाटकी घाटाच्या सुरुवातीपासून वाहनांच्या रांगा दिसताच काही वाहने उलट दिशेने बोगदामार्गे निघाली. पुण्याकडे जाणार्या वाहनांची संख्या अधिक असल्याने बोगद्यात उलट दिशेने येणार्या वाहनांमुळे एकेरी वाहतूक सुरू होऊन कोंडी झाली. त्यामुळे वेळे बाजूकडेही वाहनांच्या रांगा लागल्या. यातच अनेक राजकीय पदाधिकारी, रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या.