Khambatki Ghat: खंबाटकी घाटातील दुसरा बोगदा अंतिम टप्प्यात

मंत्री गडकरी उद्या पाहणी करणार : पुणे-सातारा प्रवास होणार अधिक वेगवान
Khambatki Ghat: खंबाटकी घाटातील दुसरा बोगदा अंतिम टप्प्यात
Published on
Updated on

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. एका बोगद्याची यशस्वी चाचणी जानेवारीत पूर्ण झाली असून त्यातून पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहतूक तेव्हापासून सुरूच आहे; तर पुणे-सातारा दिशेच्या दुसऱ्या बोगद्याचे कामही वेगाने सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी शनिवारी या बोगद्याच्या कामाची पाहणी करणार आहेत.

पुणे बाजूकडे जाताना नवीन सहापदरी बोगद्यातून चाचणी स्वरूपात वाहतूक जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. या बोगद्यामुळे खंबाटकी घाटातील धोकादायक वळणांपासून वाहनचालकांची सुटका झाली आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 15 ते 30 मिनिटांनी कमी होऊ लागला आहे. एस कॉर्नर निघाल्यामुळे अपघातांचे प्रमाणही घटले आहे.

पुण्याच्या बाजूकडून सातारा-कोल्हापूरच्या दिशेने येण्यासाठी नव्याने बोगदा तयार केला जात आहे. त्याचे कामही अंतिम टप्प्यात असून या बोगद्याच्या कामाची पाहणी मंत्री गडकरी करणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. बोगद्यामध्ये आधुनिक प्रकाश योजना, अग्निसुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही देखरेख, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तसेच वायुविजन व्यवस्था उभारली आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. खंबाटकी घाट हा पुणे-सातारा मार्गावरील सर्वाधिक वर्दळीचा आणि अपघातप्रवण भाग मानला जातो. विशेषतः पावसाळ्यात आणि सुट्टीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.

हा नवीन बोगदा सुरू झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रातील औद्योगिक व पर्यटन क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. मालवाहतूक जलद होणार असून इंधनाची बचत आणि प्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा आहे.

मंत्री गडकरी हे शनिवारी सातारा दौऱ्यावर येणार आहेत. किसन वीर सहकारी साखर कारखान्यावरील पुरस्कार सोहळ्यानंतर ते तिथून शासकीय वाहनातून 30 कि.मी.वर असलेल्या खंबाटकी बोगद्याकडे रवाना होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news