

खंडाळा/लिंब : दिवाळीचा सण संपल्यानंतर गावी आलेल्या चाकरमान्यांनी परतीचा रस्ता धरला. त्यामुळे रविवारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट ब्लॉक झाला होता. आनेवाडी टोलनाक्यावरही वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. खंबाटकी बोगदा ते पारगावपर्यंत दुपारी तीन पासून संथ गतीने वाहतूक सुरू होती. मोठ्या वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासाला अधिक वेळ लागत होता. यामुळे प्रवासी हैराण झाले होते.
दिवाळी सणासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव परिसरातील नागरिक आपल्या कुटुंबकबिल्यासह गावाकडे आले होते. दिवाळी सण संपल्याने पुन्हा उद्योगधंदे व कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग रविवारी दिसून येत होती. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहनांची संख्या होती. कोल्हापूर ते पुणे दरम्यान दिवसभर महामार्गावर वाहनांची वर्दळ होती. त्यामुळे अनेक ठिकाणी 5 ते 7 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सातारा - कोल्हापूर तसेच खांबाटकी बोगदा परिसरात परिसरात महामार्गाची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी डायव्हर्शन दिल्याने वाहनांची गती कमी होत आहे. खांबाटकी बोगद्याचे काम सुरू असल्याने सेवा रस्त्यावरून ही वाहने पारगाव खंडाळ्यापर्यंत येतात. एकावेळी दोनच वाहने जात असल्याने व वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहनांची कोंडी होऊन रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तीन ते चार किलोमीटरच्या टप्प्यात वाहतूक संथ झाली होती.
खांबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळील रस्ता अरुंद असल्यामुळे खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी 1 नंतर महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होवू लागली. यावेळी चारचाकी वाहने, मोठी व अवजड वाहने गरम होऊन रस्त्यातच बंद पडल्याने वाहतूककोंडीत भर पडत होती. तसेच बेशिस्त वाहनांमुळे अवजड वाहनधारकांसाठी अडचणी येत होत्या. खंडाळा पोलीस व महामार्ग पोलीस यांनी आज दिवसभर खांबाटकी घाट व बोगदा परिसरात बंदोबस्त ठेवल्याने वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात झाली नाही. त्यातच पावसाची रिप रिप, रस्त्यावरील खड्डे यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.