

कण्हेर : म्हसवे, ता. सातारा येथील कातकरी समाजातील 40 कुटुंबांना हक्काची घरकुले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कुटुंबांना घरकुलांसाठी माजी सरपंच रमेश शेलार व त्यांच्या कुटुंबीयांनी 50 गुंठे स्वमालकीची जागा देऊन गोरगरिबांच्या निवारासाठी हातभार दिला आहे. यामुळे कातकरी समाजातील कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने या समाजातून आनंद व्यक्त केला जात आहे. याकरिता ग्रामीण विकास यंत्रणेसह गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
म्हसवेतील 40 आदिवासी कातकरी कुटुंबे निवाऱ्यापासून वंचित होती. जागेअभावी या कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यासाठी अडचणी होत्या. याकरिता संबंधित शासकीय यंत्रणा जागेचा शोध घेत होती. या गोरगरीब कुटुंबांना घरकुले मिळण्यासाठी माजी सरपंच रमेश शेलार व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या विशेष प्रयत्नातून अखेर जागा उपलब्ध झाली. या जागेकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने जागा मालकास आर्थिक सहाय्य म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात आला. अखेर या लाभार्थींच्या घरकुलांना मंजुरी देऊन लवकरच निवारा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तलाठी सतीश पाटील यांनी सांगितले.
या उल्लेखनीय कामाची नोंद ग्रामविकास विभागाने घेतली असून म्हसवे पदाधिकारी व सातारा टीमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. महेशदादा शिंदे, प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव यांनी कौतुक केले. याकामी ग्रामविकास यंत्रणेचे विस्तार अधिकारी जयवंत ढाणे, मंडलाधिकारी जयंत जाधव, तलाठी सतीश पाटील, सरपंच सौ. मनीषा दीक्षित, उपसरपंच सचिन शेलार, ग्रामविकास अधिकारी शंकर माने यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.