

वेणेगाव : सातारा तालुक्यातील काशीळ उपसा सिंचन योजना व समर्थ गाव उपसासिंचन योजनेला 53 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे या योजनांची कामे मार्गी लागून 1 हजार 804 एकर जमिन ओलिताखाली येणार असल्याची माहिती आ. मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरातील हायवेच्या पश्चिम भागातील शेतीस पाण्याची उपलब्धता नसल्याने या ठिकाणी समर्थ गाव उपसा सिंचन योजना व काशीळ उपसा सिंचन योजना प्रस्तावित केल्या होत्या. याला कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून उरमोडी प्रकल्पांतर्गत पाणी आरक्षित करून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे या विभागातील कायमचा दुष्काळ मिटणार असून सर्वत्र बागायती क्षेत्र तयार होणार आहे. या योजनेमुळे 862 एकर क्षेत्र बागायती होणार आहे.
या योजनेस एकूण 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. या योजनेस खोडद बंधाऱ्यावरून 100 मीटर उंचीवर कुंडामधून बंदिस्त पाईपद्वारे पाणी आणण्यात येणार आहे. तसेच काशीळ सिंचन योजनेमधून 937 एकर क्षेत्रास पाणी उपलब्ध होणार आहे.
या योजनेस 28 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खोडद येथील बंधाऱ्याहून 111 मीटर हेडवर बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी पोहोचणार आहे. एकूण 53 कोटी रुपये कामास मंजुरी मिळाल्याचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले. दरम्यान, मागील आठवड्यात गणेशवाडी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करण्यात आले असून काम सुरू झाल्याचेही आ. घोरपडे यांनी सांगितले.