

बामणोली : कसबे बामणोली, ता. जावली येथे कवड्या पक्ष्याची शिकार केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दुर्बिण, बंदूक व बोलेरो गाडी जप्त करण्यात आली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी ही कारवाई केली. दरम्यान, हा गुन्हा मेढा वन विभागाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होती. नितीन भीमराव खरात, बाबू मोहन लावूड व राजाभाऊ अरूण लावूड (तिघेही राहणार पुसेगाव, ता. खटाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प उपसंचालक विजय बाठे व कर्मचारी हे बामणोली आश्रमशाळेतून परतत असताना म्हावशी गावच्या हद्दीत बोलेरो व संशयित तीन शिकारी आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी शिकार केलेला पक्षी फेकून दिला. कर्मचार्यांनी या पक्षाचा शोध घेतला. यावेळी घटनास्थळी कर्मचार्यांना मृत कवड्या पक्षी व बंदूक व दुर्बिण आढळून आली. याबाबत माहिती विचारल्यानंतर संशयितांनी पक्षाची शिकार केल्याचे कबुल केले. यानंतर संशयितांना ताब्यात घेतले. वनपाल संदीप पवार, वनरक्षक अर्जुन चव्हाण, अमोल शेंडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.