

बामणोली : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम सद्यस्थितीमध्ये ऐन बहरामध्ये आला आहे. पठारावर सध्या तेरडा, मिकी माऊस या गुलाबी व पिवळ्या फुलांचा सर्वत्र सडा पसरलेला पहावयास मिळत आहे. पठारावर सध्या पाऊस व दाट धुके असे अल्हाददायक वातावरण असून भरपावसातही पर्यटकांची रेलचेल झाली आहे.
कास पठारावरील वातावरण चिंब भिजून गेले आहे. शनिवार, रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे भरपावसातही पर्यटकांनी हजेरी लावली.ऑनलाईन बुकींग केलेले काही पर्यटक मात्र आले नव्हते. असे असले तरी अनेक पर्यटकांनी गर्दी करत पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. शनिवारी ऑनलाईन 2700 पर्यटकांनी बुकिंग केले होते. त्यापैकी साधारणपणे एक हजारावर पर्यटक हे कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आले. कोसळत असणारा पाऊस व दाट धुके यामुळे पर्यटक गारठून गेले.
रविवारी पावसाने थोडीफार उघडीप दिली होती. त्यामुळे पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळली. आणखी पाऊस उघडल्यानंतर शनिवार आणि रविवार ऑनलाईन बुकिंग केलेले पर्यटक हे इतर दिवशी कास पुष्प पठारावरील फुले पाहण्यासाठी येणार असल्याचे समितीच्या कार्यालयातील कर्मचार्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुढील शनिवार व रविवारी पर्यटकांची तोबा गर्दी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.